सांगली : जिल्ह्यातील २८ लाख २० हजार ५७५ नागरिकांच्या अन्न सुरक्षेची जबाबदारी केवळ आठ अधिकाऱ्यांवर आहे. जिल्ह्यात अडीच हजारावर औषध दुकानांवर नियंत्रणासाठी केवळ दोनच अधिकारी कार्यरत आहेत. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाकडे असलेल्या कमी मनुष्यबळामुळे अन्नसुरक्षा वाऱ्यावर असून दोन्ही विभागातील कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कामाचा ताण सहन करावा लागत आहे.
जिल्ह्यातील दहा तालुक्यात हॉटेल्स, किराणा दुकानांसह इतर आस्थापनांची तपासणी करून ग्राहकांना चांगला व दर्जेदार माल मिळावा, त्यांची फसवणूक होऊ नये व भेसळयुक्त मालापासून सुटका व्हावी यासाठी अन्न व औषध विभागाचे अधिकारी कार्यरत आहेत. जिल्ह्यात सध्या आठच अन्न निरीक्षक कार्यरत असून इतर पदे रिक्त आहेत.
जिल्ह्यात २६०० हून अधिक औषध दुकाने आहेत, त्यांच्या तपासणीसाठीही केवळ दोन अधिकारी आहेत. तरीही दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई सुरूच ठेवली आहे. मात्र, कार्यालयीन कामकाज व प्रत्यक्ष जिल्ह्यात भेटी देऊन पाहणी करण्यास प्रशासनास अडचणी येत आहेत.
चौकट
मेडिकलची तपासणी
दोनच औेषध निरीक्षक असतानाही जिल्ह्यातील मेडिकल्सची नियमित तपासणी करून नियम मोडल्यास कारवाई केली जात आहे. त्यात कोरोना कालावधीत दीडशेहून अधिक आस्थापनांची तपासणी करून अंमलबजावणीबाबत सूचना देण्यात आल्या होत्या.
चौकट
हॉटेल्सची तपासणी
जिल्ह्यातून रस्त्यांचे जाळे प्रभावी असल्याने या मार्गावर ढाबे, हॉटेल्सची संख्या जास्त आहे. याशिवाय संपूर्ण जिल्ह्यात ७९०० हॉटेल्स, ढाबे, लहान नाष्टा सेंटरची संख्या आहे. याच्याही तपासणीची जबाबदारी प्रशासनाकडे आहे.
चौकट
दूध केंद्राची कसून तपासणी
जिल्ह्यात दूध संकलन करणाऱ्या व त्यापासून पदार्थ तयार करणाऱ्या संस्थांची संख्या अधिक आहे. याठिकाणी भेसळ रोखण्यासाठी प्रशासनाने छापे टाकून आतापर्यंत १५ लाखाहून अधिकचा माल जप्त करून नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत.
कोट
विभागाकडे कमी संख्येने अधिकारी असले तरी त्याचा कामकाजावर परिणाम होऊ दिला नाही. नियमित सर्व ठिकाणी तपासणी करून त्यात बेकायदेशीर काही आढळल्यास त्यावर कारवाई करण्यात येते. कोरोना कालावधीत कमी अधिकारी असतानाही योग्य नियोजन करण्यात आले होते.
- सुकुमार चौगुले, सहा. आयुक्त, अन्न व औषध प्रशासन
पॉईंटर
जिल्ह्याची लोकसंख्या २८ लाख २० हजार ५७५
जिल्ह्यातील मेडिकल्सची संख्या २६००
जिल्ह्यातील हॉटेल्सची संख्या ७९००
औषध निरीक्षक २
अन्न निरीक्षक ८