किर्लोस्करवाडी : संपूर्ण पलूस तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या चौदा ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाला असून, काँग्रेसने आठ ग्रामपंचायतीत विजय मिळविला, तर भाजप-राष्ट्रवादीने सहा ठिकाणी सत्ता मिळविली आहे. पूर्वी काँग्रेसकडे असणाऱ्या भिलवडी, माळवाडी व धनगाव या ठिकाणी सत्तांतर होऊन त्या काँग्रेसकडून भाजप-राष्ट्रवादीकडे गेल्या आहेत, तर आंधळी, नागराळे या दोन गावात काँग्रेसने सत्ता मिळविली.बुरुंगवाडीमध्ये भाजप-राष्ट्रवादीप्रणित पॅनेलने सत्ता मिळविली आहे. तालुक्यातील आंधळी, मोराळे, रामानंदनगर, नागराळे, नागठाणे, तुपारी, भिलवडी स्टेशन, खंडोबाचीवाडीत काँग्रेसने सत्ता प्रस्थापित केली आहे. सूर्यगाव, धनगाव, दह्यारी, बुरुंगवाडी, माळवाडी या गावांमध्ये जोरदार मुसंडी मारत भाजप-राष्ट्रवादीने ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या.काँग्रेस विरुद्ध भाजप-राष्ट्रवादी आघाडी अशा लढती होत्या. मात्र काही ठिकाणी काँग्रेसमधील कार्यकर्त्यांनी भाजपबरोबर आघाडी केल्याने काही गावांवर काँग्रेसचे कार्यकर्ते आपलीच सत्ता असल्याचा दावा करीत आहेत. मात्र अशा बऱ्याच गावांमध्ये भाजपला काँग्रेसने अंतर्गत पाठिंबा दिला असला तरी, आपले उमेदवार दिले नव्हते. अशा सर्व ठिकाणी भाजप-राष्ट्रवादीने विजय मिळविला आहे. रामानंदनगरचे माजी उपसरपंच प्रशांत नलवडे यांच्या रामानंदनगर विकास आघाडीने सतरापैकी अकरा जागांवर विजय मिळविला आहे. तेथे विरोधी गटाचे सहा उमेदवार निवडून आले आहेत. मोराळे येथे काँग्रेसच्या दोन गटात लढत झाली. येथे मेजर उत्तम पाटील गटाला सहा, तर विरोधी बाळासाहेब पाटील यांच्या गटाला तीन जागा मिळाल्या. आंधळीमध्ये सत्तांतर झाले. काँग्रेसच्या विजय पवार व अशोक कदम यांच्या पॅनेलने सात जागा मिळवून सत्ता हस्तगत केली. तेथे भाजपचे मानसिंग जाधव व राष्ट्रवादीचे सर्जेराव खरात गटाला केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले. नागराळेमध्ये बऱ्याच वर्षानंतर सत्तांतर होऊन तेथे अकरापैकी आठ जागा काँग्रेसने मिळविल्या. दोन जागा विरोधी पॅनेलने व एक जागा धर्मवीर गायकवाड यांच्या पॅनेलने मिळवली. या ठिकाणी दहा वर्षानंतर काँग्रेसने सत्ता मिळविली आहे.सूर्यगावात काँग्रेसच्या सर्जेराव सूर्यवंशी यांनी भाजपच्या आप्पा सूर्यवंशी व हरिभाऊ सूर्यवंशी यांच्याशी आघाडी करून सर्वच्या सर्व सात जागांवर विजय मिळविला. नागठाणेत काँग्रेसने दहा, भाजपने तीन व अपक्षांनी दोन ठिकाणी विजय मिळविला. काँग्रेसने सत्ता कायम राखली. धनगावमध्ये मात्र काँग्रेसकडून भाजप-राष्ट्रवादीने सत्ता हस्तगत केली आहे. शंकर साळुंखे, सुनील जाधव यांच्या नेतृत्वाखाली भाजप आघाडीने सहा जागा मिळविल्या, तर सतपाल साळुंखे यांच्या काँग्रेस गटाला केवळ तीन जागा मिळाल्या. तुपारी ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसने सर्वच्या सर्व नऊ जागांवर विजय मिळवत वर्चस्व कायम ठेवले. दह्यारीत भाजपच्या माजी सरपंच मिलिंद पाटील गटाने सातपैकी चार जागांवर विजय मिळवत सत्ता कायम राखली. मात्र ते स्वत: पराभूत झाले. तेथे दादा पाटील यांच्या गटाला तीन जागा मिळाल्या आहेत.बुरुंगवाडीमध्ये नऊ पैकी पाच जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या.दोन जागांसाठी झालेल्या निवडणुकीत दोन्ही जागा भाजप आघाडीला मिळाल्या. काँग्रेसला फक्त चार जागा मिळाल्या. भिलवडी स्टेशन येथे माजी सरपंच नंदकुमार कदम यांनी पुन्हा सर्व नऊ जागांवर विजय मिळवत गेल्या पंचवीस वर्षांपासूनची काँग्रेसची सत्ता कायम राखली. खंडोबाचीवाडी येथे काँग्रेसच्या माणिक माने गटाने नऊपैकी सहा जागांवर विजय मिळविला. विरोधी जमादार गटाला केवळ तीन जागा मिळाल्या. माळवाडी या मोठ्या गावात पलूस पंचायत समितीचे विद्यमान सभापती विजय कांबळे यांनी भाजप-राष्ट्रवादीशी आघाडी करीत आठ जागा मिळविल्या. काँग्रेसचे माजी सरपंच संताजी जाधव गटाला सहा जागा मिळाल्या. वॉर्ड क्र. ३ मधील हालिमा डांगे व फातिमा सुतार या दोन उमेदवारांना प्रत्येकी ३२५ अशी मते मिळाल्याने तेथे चिठ्ठी टाकून निकाल घोषित करण्यात आला. तेथे संताजी जाधव यांच्या गटाच्या हालिमा डांगे निवडून आल्या. (वार्ताहर)भाजप-राष्ट्रवादीचे यश : अनपेक्षित सत्तामाजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र लाड यांनी नागराळे, आंधळीसारख्या ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर घडविले. या ग्रामपंचायती काँग्रेसकडे खेचून आणण्यात यश मिळविले. यशाचा आलेख चढता दिसत असला, तरी काही गावांमध्ये काँग्रेसअंतर्गत दुहीचा फटका बसल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे. म्हणूनच पलूस तालुक्यातील बऱ्याच गावात प्रथमच राष्ट्रवादी आणि भाजपने मुसंडी मारत यश मिळविले आहे. भिलवडीत कॉँग्रेसचा धक्कादायक पराभवभिलवडीत कॉँग्रेसला मात्र मोठा धक्का बसला असून, येथे भाजप-राष्ट्रवादीचे रमेश पाटील, विजय चोपडे यांच्या गटाने सतरापैकी अकरा जागांवर विजय मिळविला. काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील व मोहन तावदर यांच्या गटाला केवळ सहा जागा मिळाल्या.
पलूस तालुक्यात आठ ग्रामपंचायती कॉँग्रेसकडे
By admin | Published: November 03, 2015 11:11 PM