कोरोनाच्या भीतीने अंत्यसंस्कारासाठी ग्रामस्थ येईनात, अशी परिस्थिती निर्माण झाली. मृत्यू झालेले काही ४५ वर्षांपुढील, तर काही ६० वर्षांपुढील असल्याचे नागरिकांनी सांगितले.
डफळापूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कुडणूर उपकेंद्रातील डॉक्टर गावात काहीवेळा हजर नसल्याने सतीश पांढरे, अमृत पाटील यांच्यासह नागरिकांनी जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील, पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण यांच्याबरोबरच मंगळवारी डफळापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात ठिय्या मांडला व याबाबत केंद्राच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. कुडणूर येथे आरोग्य कर्मचारी गैरहजर राहत असल्याने गावात आरोग्याची स्थिती बिघडल्याचा नागरिकांनी आरोप केला.
आठवड्यात आठ नागरिकांचा झालेला मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचा शोध आरोग्य विभागाने घेण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. महादेव पाटील, दिग्विजय चव्हाण यांनी केंद्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावत, गावातील आरोग्य व्यवस्थेकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली.
कुडणूर येथे मृत नागरिकांच्या नातेवाईकांची कोरोना तपासणी करण्यात येणार आहे. त्याशिवाय तपासणीसाठी पथक नेमल्याचे डफळापूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित चोथे यांनी सांगितले.
प्रांताधिकारी प्रशांत आवटे म्हणाले की, ग्रामस्थांनी भीती बाळगू नये. मृत्यू झालेल्या कुटुंबातील तपासणीनंतर एकही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला नाही.