गजानन पाटील ।संख : शासनमान्य हमीभाव तूर खरेदी केंद्रावरील तूर खरेदीची मुदत संपल्याने १६ मेपासून केंद्र बंद करण्यात आले आहे. तूर खरेदीची शेतकºयांना हेक्टरी अट लावण्यात आल्याने कोंडी झाली होती. काही शेतकºयांकडे तूर शिल्लक आहे. तालुक्यामध्ये शेतकºयांकडे अजूनही ८०० क्विंटल तूर खरेदीविना पडून आहे. कवडीमोल भावाने तूर विक्री करावी लागणार आहे. कृषी राज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच शेतकºयांना टाहो फोडावा लागत आहे.
जिल्ह्यातील पहिले हमीभाव केंद्र १ फेबु्रवारीला सुरू झाले. शासनाने ५ हजार ४५० रुपये प्रति क्विंटल हमीभावाप्रमाणे खरेदी करण्यास सांगली कृषी उत्पन्न समितीतील तूर खरेदी केंद्रावर १२ हजार शेतकºयांनी नोंदणी केली. या शेतकºयांकडून १४ हजार ७७५ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. शासनाने खरेदी केलेल्या तुरीपैकी एक हजार शेतकºयांना ५ हजार ४५० रुपयांप्रमाणे बिले मिळाली आहेत. अजूनही दोनशे शेतकºयांची बिले मिळणे बाकी आहे.
यावर्षी तूर खरेदी करताना हेक्टरी अट लावण्यात आली होती. अटीनुसार हेक्टरी अडीच क्विंटलच तूर खरेदी करण्यात आली. एका शेतकºयाकडून जास्तीत जास्त २० क्विंटलच तूर खरेदी करण्यात आली. हेक्टरी अट लावण्यात आल्याने शेतकºयांची कोंडी झाली होती. खरीप हंगामात कडधान्य पीक म्हणून तूर पीक घेतले जाते. कमी खर्चात, पावसावर, कमी भांडवलात व माळरानावर तूर पीक येत असल्याने हे पीक घेण्याकडे शेतकºयांचा कल वाढला आहे. तालुक्यात गेल्यावर्षी ३४०० हेक्टर क्षेत्रावर तूर पीक घेण्यात आले. यावर्षी २ हजार १०० हेक्टर पीक घेतले होते.
अनुकूल हवामानामुळे पिकाची उगवण चांगली झाली आहे. पण दिवसभर ऊन, रात्रीची थंडी, पहाटे धुके यामुळे शेंगेवर हिरवी अळी या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला. शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात औषधांची फवारणी केली आहे. शेंगात दाणे भरण्याच्यावेळीच प्रतिकूल हवामानामुळे तूर उत्पादनात घट झाली आहे.
तसेच गेल्यावर्षी तूर खरेदी केंद्र लवकर बंद झाल्यामुळे तालुक्यात टोकन न घेतलेल्या शेतकºयांची अडीच हजार क्विंटल तूर खरेदीविना पडून राहिली. त्यामुळे तूर घेण्याकडे यावर्षी कल कमी झाला आहे. सध्या जत, संख बाजारात ३ हजार ४०० रुपये असा दर आहे. कवडीमोल भावाने विक्री होत आहे. याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.सरकार का सवलत देत नाही?तुरीची आधारभूत किमत क्विंटलला ५४५० रुपये आहे. कर्नाटक सरकार शेतकºयांना क्विंटलला ५०० रुपये अनुदान देते, तर राज्य शासन तुरीला काहीच अनुदान देत नाही. कर्नाटकात ५९५० रुपये क्विंटल दराने खरेदी करते. गावातील सेवा सोसायटीला खरेदी करण्याचे अधिकार दिलेले होते, तर मग आमचे शासन शेतकºयांना सवलत का देत नाही? हा सवाल उपस्थित केला जात आहे.हेक्टरी अडीच क्विंटलच्या अटीमुळे तूर शिल्लक राहिली आहे. कमी दराने विकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. शासनाने अट काढून टाकावी. - कामाण्णा पाटील, शेतकरी