सांगली : धान्य वितरण प्रणालीत अधिकाधिक पारदर्शकता यावी, या हेतूने रेशनकार्ड आधार कार्डशी संलग्नित करण्याची प्रक्रिया जिल्हाभर सुरू असताना, त्यास प्रतिसाद न देणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदारांवर आता प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. ५० टक्क्यांपेक्षा कमी आधार संलग्नतेचे काम करणाºया दुकानांवर कारवाई होणार असून आतापर्यंत आठ दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत, तर शंभरावर दुकानदारांवर कारवाईची तयारी प्रशासनाने केली आहे.
धान्य वितरण प्रणालीत पारदर्शकता आणण्यासाठी शासनातर्फे विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. यानुसार धान्य वितरणातील बोगस कार्डधारकांना चाप लावण्यासाठी रेशनकार्ड आधारशी संलग्न करण्याची मोहीम गेल्या दोन वर्षांपासून राज्यभर सुरू आहे. यात पुणे विभागात सांगली दुसºया क्रमांकावर आहे, तर कोल्हापूर मोहिमेच्या सुरूवातीपासूनच अग्रक्रमावर आहे.
आधार संलग्न प्रक्रियेस काही दुकानदार प्रतिसाद देत असले तरी, ५० टक्क्यांपेक्षा कमी संलग्न करून शासनाच्या आदेशास प्रतिसाद न देणाºयांवर आता पुरवठा विभागाने कारवाई सुरू केली आहे. यानुसार सांगलीतील पाच, तर खानापूर तालुक्यातील ३ दुकानांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अजूनही शंभरावर दुकानांवर कारवाईची तयारी प्रशासनाने केली आहे.
जिल्ह्यात आधार जोडणीचे ९६ टक्के काम पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात ३ लाख ८७ हजार ७६५ कार्डधारक असून यातील ३ लाख २० हजार २४१ कार्डधारकांची आधार जोडणी पूर्ण झाली आहे. आधार जोडणीत शिराळा तालुक्याने आघाडी घेतली असून वाळवा तालुका सर्वात मागे आहे.३० जूनपर्यंत मुदतजिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड म्हणाले, जिल्ह्यातील सर्व दुकानदारांनी आधार जोडणीसाठी प्राधान्य द्यावे. ई केवायसीच्या माध्यमातून उर्वरित नोंदणी पूर्ण करावी. ३० जूनपर्यंत आधार जोडणीचे काम पूर्ण होणे आवश्यक असून त्यादृष्टीने दुकानदारांना सूचना देण्यात आल्या आहेत. तरीही दिरंगाई करणाºया दुकानदारांवर कारवाई करणार आहे.