लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : कडक लॉकडाऊन असतानाही येथील बाजार समितीच्या आवारात सकाळी भाजीपाल्याच्या दलालांची गर्दी होत असल्याने शुक्रवारी सकाळी पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाने कारवाई करून आठ टन भाजीपाला जप्त केला.
इस्लामपुरात कडक लॉकडाऊन असतानाही भल्या पहाटे काही दलाल बाजार समितीच्या आवारात भाजीपाल्यासाठी गर्दी करीत आहेत. शेतकऱ्यांकडून कवडीमोल दराने खरेदी केलेला माल किरकोळ विक्रेत्यांना चढ्या दराने देत आहेत. गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. यावर ‘लोकमत’ने आवाज उठविल्यानंतर शुक्रवारी पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या पथकाने आणि नगरपालिकेच्या विजय टेके, विष्णू माळी, विशाल गुरव, अरुण जाधव, बाळू सूर्यवंशी या कर्मचाऱ्यांनी बाजार समितीच्या आवारातील आठ टन भाजीपाला जप्त करून पालिकेत नेला.
सध्या बाजार समितीने व्यवहार बंद ठेवले आहेत, तरीही आवारात दलालांकडून गर्दी होत आहे. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला माल बेकायदेशीररीत्या किरकोळ व्यापाऱ्यांना विकला जात आहे. यावेळी ग्राहकही खरेदीसाठी गर्दी करत आहेत. त्यामुळेच कारवाई करण्यात आली.
चौकट
‘लोकमत’चा दणका
इस्लामपुरात लॉकडाऊनमध्ये यापूर्वी भाजीविक्रेते रस्त्यावर भाजी विकत होते. त्याबाबत ‘लोकमत’ने वारंवार आवाज उठवल्यानंतर कारवाई झाली. आता बाजार समितीच्या आवारात गर्दी होऊ लागली होती. त्यावरही ‘लोकमत’नेच आवाज उठवून कारवाई करण्यास भाग पाडले.