अंजर अथणीकर : सांगली, एकीकडे प्लॉटच्या किमती भरमसाट वाढत असताना, दुसरीकडे बांधकाम व्यावसायिक व प्लॉटमालकांनी बांधलेल्या रहिवासी संकुलांतील फ्लॅट (सदनिका) विक्रीविना पडून आहेत. सांगली शहर व परिसरातील सुमारे आठशेहून अधिक फ्लॅट विक्रीविना पडून असून, त्याचा भुर्दंड बांधकाम व्यावसायिकांना सोसावा लागत आहे. गेल्या तीन-चार वर्षात येथील गावभागासह गावठाण व उपनगरांत मोठ्याप्रमाणात रहिवासी व व्यावसायिक संकुलांची (अपार्टमेंट) उभारणी झाली. विशेषत : सांगली-मिरज रस्त्यावर या संकुलांचे प्रमाण अधिक आहे. प्लॉटच्या मालकांनी जागांच्या वाढत्या किमती लक्षात घेऊन स्वत:च्या प्लॉटमध्येच उभारण्यास सुरुवात केली. बाजारातील मागणीचा अंदाज न घेता मोठ्याप्रमाणात संकुलांचे बांधकाम झाल्याने, मागणीच्या तुलनेत फ्लॅटची संख्या अधिक झाली. त्यामुळे गेल्या दोन वर्षात फ्लॅटची मागणी ठप्प झाली आहे. संकुलांच्या बांधकामासाठी सध्या बाराशे ते चौदाशे रुपये प्रति चौरस फूट खर्च येतो, मात्र फ्लॅटना केवळ सोळाशे रुपयांपर्यंत मागणी आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांना फटका बसत आहे. यापूर्वी फ्लॅटमध्ये गुंतवणूक केली जात होती. फ्लॅट घेऊन ते भाड्याने देणे, नंतर चांगला दर आल्यास त्याची विक्री करणे, असा व्यवसायही सुरू होता, पण गेल्या तीन वर्षांपासून फ्लॅटचे दर स्थिर राहिल्याने त्यातील गुंतवणूक थांबली आहे. शहर व परिसराची फ्लॅटची गरज जवळपास संपुष्टात आली असल्याने ही स्थिती निर्माण झाली असल्याची माहिती बांधकाम व्यावसायिकांनी दिली. शहर व परिसरातील फ्लॅटच्या किमती पंधरा ते तीस लाखाच्या दरम्यान आहेत. वन बीएचके (एक बेडरुम, किचन व हॉल) फ्लॅटची ंिकंमत पंधरा ते वीस लाखाच्या घरात आहे. टू बीएचके (दोन बेडरुम, हॉल व किचन) फ्लॅटची किंमत २५ ते ३० लाखाच्या घरात आहे. सांगलीची लोकसंख्या व मागणीच्या प्रमाणात आता फ्लॅट पुरेसे झाल्याने मागणी घटली आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षापासून रहिवासी संकुलांच्या व्यवसायामध्ये मंदीचे वातावरण आहे.
आठशेवर फ्लॅट विक्रीविना पडून!
By admin | Published: July 10, 2014 12:35 AM