जत : येळदरी (ता. जत) येथे मालवाहतूक रिक्षा पलटी होऊन झालेल्या अपघातात आठ शेतमजूर महिला जखमी झाल्या आहेत. ही घटना रविवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. जखमीवर जत शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत जत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
याबाबत अधिक माहिती अशी की, दऱ्याप्पा देवकते (रा. येळदरी) हे त्यांची माल वाहतूक रिक्षा (एमएच १०, सीआर ३२९५) मधून बिळूर येथील द्राक्ष बागेत काम करणाऱ्या शेतमजूर महिलांना घेऊन जतकडे येत असताना येळदरीजवळील धोकादायक वळणावर देवकते याचा रिक्षावरील ताबा सुटल्याने अचानक रिक्षा पलटी झाली. यावेळी रिक्षात असलेल्या शेतमजूर महिला राजाबाई यल्लाप्पा माने (वय ५०), उज्ज्वला पवार (४०), मालन कणसे (६०), संगीता माने (५०), रंजना गाडीवडर (६०), पुतळाबाई शिंदे (६०), राजाबाई अण्णाप्पा माने (५०, सर्व रा. वसंतनगर, जत) या आठ महिला जखमी झाल्या आहेत. त्यापैकी चार महिलांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर जत शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात घडल्यानंतर रिक्षा चालक दऱ्याप्पा देवकते यांनी घटनास्थळावरून पलायन केले होते. त्यानंतर येळदरी गावातील नागरिक त्याला पकडून आणून जखमी झालेल्या महिलांच्या नातेवाइकांच्या ताब्यात दिले आहे. दरम्यान जत नगरपालिकेचे माजी नगरसेवक परशुराम मोरे यांनी जखमी महिलांवर प्रथम जत ग्रामीण रुग्णालयात उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी जत शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.