अंजर अथणीकर ल्ल सांगलीजुन्या, अवीट गोडीच्या गीतांचे शौकीन सर्वत्र सापडतात. मात्र सांगलीत अशा दर्दींनी ‘यादे सिने संगीत क्लब’ स्थापन करून अठरा वर्षे या गाण्यांची गोडी जोपासली आहे. डॉक्टर, अभियंते, वकील, प्राध्यापक मंडळींसह उद्योजक, सामाजिक कार्यकर्त्यांसह सुमारे दीडशेजण या क्लबमध्ये सहभागी झाले आहेत. अठरा वर्षांपूर्वी या क्लबचे काहीजण एका कार्यक्रमाच्यानिमित्ताने एकत्रित आले. तेव्हा कार्यक्रमस्थळी जुनी गाणी स्टेरिओवर वाजत होती. बरेचजण ही गाणी ऐकण्यात मग्न झाले होते. एकमेकांच्या चौकशीत सर्वांनाच जुन्या गाण्यांचा छंद असल्याचे दिसून आले. त्याचवेळी असा छांदिस्टांचा क्लब काढण्याचा निर्णय झाला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सतीश डोडिया यांनी बैठक बोलावली आणि या बैठकीत ‘यादे सिने संगीत क्लब’ या नावावर शिक्कामोर्तब झाले. पद्माताई पुरोहित संस्थापक-अध्यक्षा झाल्या. सध्या या क्लबमध्ये डॉ. सुनील पाटील, शिरीष जोशी, अविनाश टिळक, डॉ. भरत शहा, रमेश शहा, डॉ. अनिल मडके, डॉ. सुहास पाच्छापूरकर, अभियंते विनायक रसाळ, प्रा. श्रीराम कानिटकर, डॉ. कुंदा पाच्छापूर, महेश कराडकर आदी विविध क्षेत्रातील, व्यवसायातील सुमारे दीडशे सभासद आहेत. प्रत्येक पंधरवड्याला, विविध दिनांचे औचित्य साधून ते जुन्या गाण्यांची मैफल आयोजित करतात. कुंदनलाल सैगलपासून तलत मेहमूद ते किशोरकुमारपर्यंत आणि शमशाद, उमादेवीपासून ते आशा भोसलेंपर्यंतच्या सर्व गायक-गायिकांनी गायिलेली अविस्मरणीय गीतांची दृकश्राव्य सुरेल गीतांची मैफल आयोजित करण्यात येते. या क्लबमधील बहुतांशी सभासदांचा आवाजही चांगला आहे. त्यामुळे तेच कार्यक्रम सादर करतात. बहुतांश वेळा वादकही सभासदच असतात. काहीजणांनी आपापल्या आवडत्या गायकांची संपूर्ण माहिती व चित्रफित संकलित केली आहे. एखादे गीत सादर करण्यापूर्वी गायकाची पूर्ण माहिती, संबंधित गीताची रचना होण्यामागील घडामोडी, गीत सादर करताना झालेले व्हिडीओ रेकॉर्डिंग यांची चित्रफीत सादर करण्यात येते. यामुळे रसिकांंना गाणे ऐकण्यापूर्वीच त्याचे महत्त्व आणि दुर्मिळ माहिती मिळण्यास मदत होते. बऱ्याचवेळा मुख्य गायकाच्या आवाजात गाणे रेकॉर्डिंग करण्यापूर्वी सहाय्यकांकडून ते गायले जाते. अशा मूळ आणि दुर्मिळ गीतांचाही संग्रह सभासदांनी केला आहे. अशी गाणी आॅडिओ आणि व्हिडीओ पध्दतीने सादर करण्यात येतात. सामाजिक मदतीसाठीही या क्लबकडून कार्यक्रम होतात. मात्र या कार्यक्रमांना कोणतेही व्यावसायिक स्वरूप देण्याचे आजपर्यंत कटाक्षाने टाळले आहे. ‘नदीया किनारे पूनम की रात’त्रिपुरारी पौर्णिमेला नदीत तरंगणाऱ्या आणि कृष्णा घाट उजळविणाऱ्या नयनरम्य दीपोत्सवाचा आनंद घेत नदीया किनारे पूनम की रात हा नदी आणि चंद्र यावरील गाण्यांचा अप्रतिम कार्यक्रम शिरीष जोशी यांनी सादर केला. वसंतदादांच्या समाधीमागे झालेल्या या कार्यक्रमाने अनेक रसिक सांगलीकर भारावून गेले. ंशास्त्रीय संगीत मैफिलशास्त्रीय संगीताची रागदारी आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर किती उपयुक्त ठरु शकते, याची माहितीही रागावरील आधारित गाण्यांच्या कार्यक्रमात देण्यात येते. रागाचे स्वर, सूर कसा आनंद देतात आणि रागदारी म्हणजे काय, या सप्तसुरात गुंफलेली गाणी ऐकताना कसे भान हरपते... या रागदारीची माहिती देत एकाच रागावर विविध चालींची अनेक गाणी ऐकवीत डॉ. सुरेश उपळावीकर शास्त्रीय संगीताची ओळख करुन देतात.
सांगलीत संगीत क्लबचा अठरा वर्षांचा सिलसिला
By admin | Published: March 20, 2017 11:43 PM