इस्लामपूर : वाटेगाव (ता. वाळवा) येथे उसनवार दिलेल्या पैशाच्या वादातून झालेल्या खूनप्रकरणी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयातील दुसरे जिल्हा न्यायाधीश आर. बी. रोटे यांनी आरोपी शंकर महादेव सावंत (वय ४८, रा. वाटेगाव) याला जन्मठेप आणि १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यात पोलीस दलातून नुकत्याच निवृत्त झालेल्या लुसी या श्वानाने आरोपी सावंत याची ओळख पटवली होती.सागर विलास नलवडे (वय २८, रा. वाटेगाव) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. खुनाची ही घटना मे २०१५ मध्ये येवलेवाडी फाट्यावरील रोपवाटिका परिसरात घडली होती. आरोपी सावंत याने दंडाची रक्कम न भरल्यास त्याला आणखी १ महिना सश्रम कारावास भोगावा लागणार आहे. या खटल्यात अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील शुभांगी पाटील यांनी काम पाहिले.या खटल्याची पार्श्वभूमी अशी, सागर नलवडे याने आरोपी शंकर सावंत याच्याकडून १० हजार रुपये घेतले होते. सावंत हा या पैशाची वारंवार मागणी करत होता. मात्र सागर पैसे देण्यास टाळाटाळ करत होता. हा राग मनात धरून आरोपी शंकर सावंत याने त्याला मद्यपान करण्याचा बहाणा करत बरोबर घेतले. येवलेवाडी फाटा येथे आल्यावर सागर नलवडे याला दारू पाजून त्याच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात सागरच्या पोटावर, तोंडावर आणि कपाळावर वार झाल्याने अतिरक्त रक्तस्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेनंतर विलास तातोबा नलवडे याने कासेगाव पोलिसांत फिर्याद दिली होती. सरकार पक्षातर्फे ३२ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये पोलिसांचे लुसी श्वान हा महत्त्वाचा साक्षीदार ठरला. तपास अधिकारी नंदकुमार मोरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. बी. वाठारकर व इतरांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. खटल्यात सरकार पक्षाला हवालदार एम. के. गुरव, पोलीस नाईक पवार, पैरवी अधिकारी चंद्रकांत शितोळे यांनी मदत केली.लुसीच्या कामगिरीने आरोपी गजाआडवाटेगाव येथील या खून प्रकरणात कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार उपलब्ध नव्हता. तसेच महत्त्वाचे साक्षीदार फितूर झाले. मात्र पोलीस दलातील लुसीने आपले चालक हवालदार अनिल रजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी शंकर सावंत याची घटनास्थळावरच ओळख पटवली होती. लुसीला मृताच्या अंगावरील कपडे आणि रक्ताने अर्धवट माखलेल्या चाकूच्या मुठीचा वास देण्यात आल्यावर लुसीने शंकर सावंत याला ओळखून काढले. लुसीच्या या कामगिरीने सावंत याला जन्मठेपेची शिक्षा मिळाली.
वाटेगाव खूनप्रकरणी एकास जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 12:05 AM