सांगली : शहरातील विश्रामबाग येथील ८० फुटी रोडवर कारने दिलेेल्या धडकेत जखमी झालेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बबन लक्ष्मण राजमाने (वय ७५) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी आनंदकुमार बबन राजमाने (रा. स्फूर्ती चौक, सांगली) यांनी मेघा वासुदेव दांडेकर (रा. सावरकर काॅलनी, सांगली) या महिलेविरोधात विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रविवार, ८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ च्या सुमारास ८० फुटी रोडवरून बबन राजमाने चालत चालले होते. या वेळी समोरून संशयित मेघा दांडेकर ही चार चाकी (एमएच ०८ - एजी ५४८९) मधून भरधाव वेगाने आली व तिने राजमाने यांना समोरून धडक दिली. या धडकेत राजमाने खाली पडल्याने त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांचा मुलगा आनंदकुमार यांनी विश्रामबाग पोलिसात दांडेकर हिच्याविरोधात फिर्याद दिली आहे.