मिरज पंचायत समिती सभापती निवड २५ फेब्रुवारीला, काँग्रेसच्या पूनम कोळी भाजपच्या पाठिंब्यावर लढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 01:04 PM2022-02-16T13:04:34+5:302022-02-16T13:05:44+5:30
पंचायत समितीत भाजपमध्ये फूट पाडण्यात महाविकास आघाडी यशस्वी ठरली आहे
मिरज : मिरज पंचायत समितीच्या सभापती पदाची २५ फेब्रुवारी रोजी निवड होणार आहे. तसा आदेश तहसीलदार डी. एस. कुंभार यांनी पंचायत समिती प्रशासनास दिला. सदस्यांना निवडीची नोटीस दिली आहे. मूळच्या महाविकास आघाडीच्या व भाजपला पाठिंबा दिलेल्या बिसूरच्या पूनम कोळी या भाजपच्या पाठिंब्यावर सभापतीची निवडणूक लढविणार आहेत. विरोधी महाविकास आघाडीने भूमिका स्पष्ट केली नाही.
सभापती पदाचा सुमन भंडारे यांनी राजीनामा दिल्याने पद रिक्त होते. नवीन सभापती पदाच्या निवडीसाठी तहसीलदार कुंभार यांनी कार्यक्रम जाहीर केला. ही निवड २५ फेब्रुवारीस होणार आहे. गत निवडीत काँग्रेसच्या पूनम कोळी यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडत भाजपला पाठिंबा दिल्याने भाजपच्या नरवाडच्या सदस्या सुमन भंडारे यांना सभापतीपदाची संधी मिळाली होती.
भंडारे यांच्या निवडीवेळी भाजपला पाठिंबा दिलेल्या कोळी यांना सभापती पद देण्याचा शब्द खा. संजयकाका पाटील यांनी दिला होता. यामुळे कोळी यांना संधी देण्यासाठी सुमन भंडारे यांना वीस दिवसांत सभापती पदाचा राजीनामा द्यावा लागला. सध्या भाजपच्या पाठिंब्यावर मूळच्या काँग्रेसच्या असलेल्या पूनम कोळी सभापती पदाची निवडणूक लढविणार आहेत.
महाविकास आघाडीच्या भूमिकेकडे लक्ष !
पंचायत समितीत भाजपमध्ये फूट पाडण्यात महाविकास आघाडी यशस्वी ठरली आहे. सध्या याच बळावर अनिल आमटवणे यांच्याकडे उपसभापती आहे. गत सभापती निवडीत आघाडीने सत्तांतराचीही तयारी केली होती. मात्र, ती यशस्वी झाली नाही. सध्या महाविकास आघाडीत निवडीबाबत हालचाली दिसून येत नसल्या तरी महाविकास आघाडी ऐनवेळी कोणती भूमिका घेणार याची उत्सुकता लागून आहे.