कडेगाव : कडेगाव तालुक्यातील ‘क’ वर्ग दर्जा असलेल्या २३ सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम सहायक निबंधक अमोल डफळे यांनी जाहीर केला आहे. यामध्ये ६ सर्व सेवा सहकारी सोसायट्या, ७ पतसंस्था, ४ औद्योगिक संस्था, २ शेतीमाल प्रक्रिया संस्था, २ पगारदार पतसंस्था, तसेच इतर सर्वसाधारण २ संस्थांचा समावेश आहे. निवडणूक लागलेल्या संस्थांपैकी बहुतांश संस्था आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहेत. यामुळे बहुसंख्य संस्थांची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.अमोल डफळे म्हणाले की, राज्य शासनाने सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी निवडणूक प्राधिकरण स्थापन केले आहे. आता ‘क’ वर्ग दर्जाच्या संस्थांचा निवडणूक कार्यक्रम सुरू झाला आहे. नेवरी येथील माजी सैनिक ग्रामीण बिगरशेती पतसंस्था आणि आसद येथील चौंडेश्वरी ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेत निवडणूक बिनविरोध झाली आहे.निवडणूक लागलेल्या सर्व सेवा सहकारी सोसायट्या पुढीलप्रमाणे : अपशिंगे सर्व सेवा सोसायटी, आ. संपतराव देशमुख विविध कार्यकारी सहकारी संस्था कडेपूर, उपाळे वांगी सोसायटी, खांबाळे औंध सोसायटी, येतगाव सोसायटी, येवलेवाडी सोसायटी.पतसंस्था : दत्त ग्रामीण बिगरशेती पतसंस्था हिंगणगाव खुर्द, क्रांतिसागर पतसंस्था कडेगाव, महालक्ष्मी महिला पतसंस्था कडेगाव, महादेव काका पतसंस्था रामापूर, नेताई पतसंस्था उपाळे (मायणी).पगारदार पतसंस्था : लोकनेते मोहनराव कदम सोनहिरा साखर कारखाना सेवक पतसंस्था वांगी, अभिजित कदम साकोस्पिन सेवक पतसंस्था कडेगाव. शेतीमाल प्रक्रिया संस्था : ज्योतिर्लिंग शेतीमाल प्रक्रिया सहकारी संस्था कडेगाव, सोनहिरा कृषी प्रक्रिया संस्था चिंचणी (वांगी). औद्योगिक संस्था : विजयमाला कदम महिला औद्योगिक सहकारी संस्था कडेगाव, श्री कृष्ण औद्योगिक संस्था रायगाव, यशश्री महिला औद्योगिक संस्था येतगाव, जय मल्हार मागासवर्गीय औद्योगिक संस्था कडेपूर.इतर सर्वसाधारण संस्थांमध्ये धनलक्ष्मी स्वयंरोजगार सेवा संस्था, कडेगाव आणि संपतराव देशमुख ऊस तोडणी व वाहतूक सहकारी संस्था रायगाव या संस्थांचा समावेश आहे. या संस्थांच्या निवडणुकीसाठी २८ जानेवारी २०१५ पर्यंत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया होत आहे. या कालावधित सहकारी संस्थांच्या निवडणुकीची सर्व प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. नामनिर्देशन पत्रांची विक्री व स्वीकृती, नामनिर्देशन पत्राची छाननी, मतदान घेऊन निकाल जाहीर करणे आदी प्रक्रिया होणार आहे. (वार्ताहर)पतसंस्था संचालकांना डिपॉझिटची सक्तीनिवडणूक प्राधिकरणाने पतसंस्थेची निवडणूक लढवून जे संचालक होणार आहेत, त्यांनी डिपॉझिट भरणे कायद्याने बंधनकारक केले आहे. तालुक्यापेक्षा मोठे कार्यक्षेत्र असलेल्या पतसंस्थांसाठी २५ हजार, जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या पतसंस्था संचालकांना ५० हजार, विभागीय कार्यक्षेत्र ७५ हजार, राज्य कार्यक्षेत्राच्या पतसंस्थांसाठी १ लाख ५० हजार डिपॉझिट भरणे बंधनकारक आहे. जे संचालक डिपॉझिट भरणार नाहीत, त्यांचे संचालकपद रद्द करण्याची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे पतसंस्थांच्या संस्थापकांना उमेदवार शोधावे लागतील, अशी चर्चा आहे.
कडेगावमध्ये २३ संस्थांच्या निवडणुका
By admin | Published: December 15, 2014 10:46 PM