सांगली : जानेवारी ते डिसेंबर २०२४ या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. दि. ९ जुलैला मतदार यादी प्रसिद्ध होणार असून त्याची प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. लवकरच निवडणुकांच्या तारखाही जाहीर होणार आहेत.नवनिर्मित, मागील निवडणुकांमध्ये चुकीची प्रभागरचना आणि बहिष्कार व इतर कारणांमुळे निवडणुका न होऊ शकलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू आहेत. ग्रामपंचायतीतील सदस्य आणि थेट सरपंचांच्या रिक्त झालेल्या जागांच्या पोटनिवडणुकांसाठी पारंपरिक पद्धतीने प्रक्रिया राबविण्यासाठी मतदार यादीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने घोषित केला आहे.यामध्ये सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील भाग्यनगर, पळशी, आटपाडी तालुक्यातील खांजोडवाडी, मिरज तालुक्यातील जुनी धामणी या चार ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी मतदार यादी करण्यासाठी प्रशासनाने कामकाज सुरु केले आहे. विधानसभेची मतदार यादी यापुढे होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांसाठी मतदार यादी तयार करण्यासाठी वापरण्यात येणार आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी राजीव शिंदे यांनी दिली.
असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम
- प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे : दि. ९ जुलै २०२४
- हरकती व सूचना दाखल दि. ९ ते १५ जुलै २०२४
- प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे : १९ जुलै २०२४
या ग्रामपंचायतीच्या निवडणूका
- भाग्यनगर, पळशी (ता. खानापूर)
- खांजोडवाडी (ता. आटपाडी)
- जुनी धामनी (ता. मिरज)