अशोक डोंबाळे ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : म्हैसाळ, ताकारी आणि टेंभू उपसा सिंचन योजनांचे ४२ कोटी ५१ लाखांचे वीज बिल थकले आहे. यामध्ये एप्रिलच्या दहा कोटी ६० लाखांच्या वीज बिलाचा समावेश असल्यामुळे, ते भरण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगली पाटबंधारे विभागाकडे नोटीस बजावली आहे. पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे टंचाई निधीतून पैशाची मागणी केली आहे. पण, त्यांच्याकडून प्रतिसाद नसल्यामुळे अधिकारी हवालदिल झाले आहेत.लोकसभा निवडणुका आणि त्यातच यंदा जिल्ह्यातील पाच तालुके दुष्काळात होरपळत असल्यामुळे शासनाच्या आदेशानुसार टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजना सुरू आहेत. दुष्काळात योजना चालू राहिल्यामुळे जत, आटपाडी, खानापूर, कडेगाव, कवठेमहांकाळ, तासगाव, मिरज अशा सात तालुक्यातील १२० गावांमध्ये टंचाईची तीव्रता कमी झाली आहे. शासनाचा टंचाई निवारणावर होणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च वाचला आहे. मात्र शासनाकडून टंचाईतून वीज बिल भरण्यासाठी पाटबंधारे विभागाला सहकार्य नसल्यामुळे शासकीय यंत्रणांच्या वादात ऐन दुष्काळात योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.म्हैसाळ योजनेची ३१ मार्च २०१९ पूर्वीची २३ कोटी सहा लाख रुपये वीज बिलाची थकबाकी होती. यामध्ये एप्रिलच्या बिलाची पाच कोटी ८६ लाखांची भर पडून तो आकडा २८ कोटी ९२ लाखांपर्यंत गेला आहे. ताकारी आणि टेंभू उपसा सिंचन योजनांच्या वीज बिलाचा प्रश्न काही प्रमाणात कमी आहे. कारण, तेथील साखर कारखाने आणि शेतकरीही नियमित पाणीपट्टीचे पैसे भरत असल्यामुळे या योजनांची थकबाकी कमी आहे. हे जरी खरे असले तरी, काही कारखान्यांनी शेतकºयांकडून वसूल केलेले पैसेही वेळेवर पाटबंधारे विभागाकडे भरले नाहीत. परिणामी टेंभू, ताकारी सिंचन योजनांच्या वीज बिलाच्या थकबाकीचा प्रश्न निर्माण होत आहे. काही ठिकाणी पाटबंधारे विभागाकडे पाणीपट्टी वसुलीची यंत्रणाच नसल्यामुळे थकबाकी दिसत आहे. या सावळ्या गोंधळामुळेही पाणीपट्टी थकीत राहिली आहे. काही गावांमध्ये तर पाणीपट्टी १०० टक्के वसूल झाल्यानंतर ती पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात ५० टक्केच पोहोचते, अशा शेतकºयांच्या तक्रारी आहेत.ताकारी योजनेचे मार्च २०१९ अखेरचे सहा कोटी सात लाखाचे वीज बिल थकीत आहे. यामध्ये तीन कोटी सहा लाख रुपये एप्रिल २०१९ च्या बिलाची भर पडून ९ कोटी १३ लाख रुपये झाले आहेत. टेंभू योजनेचे पूर्वीचे थकीत वीज बिल दोन कोटी २४ लाख असून, एप्रिल २०१९ चे वीज बिल एक कोटी ६७ लाखांचे आहे. एप्रिल २०१९ चे वीज बिल भरण्यासाठी महावितरणच्या अधिकाºयांनी टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ योजनेच्या अधिकाºयांना नोटीस बजावली आहे. यामध्ये पुन्हा मे महिन्याच्या बिलाचीही भर पडणार आहे.८१-१९ टक्केचा फॉर्म्युला : फायद्याचाताकारी, टेंभू, म्हैसाळ उपसा सिंचन योजनांचे वीज बिल भरण्यासाठी शासनाने ८१-१९ टक्केचा फॉर्म्युला केला आहे. या फॉर्म्युल्यानुसार ८१ टक्के वीज बिल कृष्णा खोरे महामंडळाने भरायचे आहे, तर १९ टक्के वीज बिल शेतकºयांकडून वसूल करायचे आहे. १९ टक्केनुसार बहुतांशी शेतकºयांकडून वीज बिलाची रक्कम वसूल होत आहे.
उपसा सिंचन योजनांचे वीज बिल ४२ कोटींवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2019 11:28 PM