इस्लामपूर : शहरामध्ये शुक्रवारी सायंकाळी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. यावेळी तीन ठिकाणी वीज कोसळली. राजारामबापू कारखाना पेट्रोल पंप, दूध संघ आणि महादेवनगर परिसरात वीज कोसळली. यामध्ये दूध संघातील उपकरणांचे २० लाख रुपयांचे नुकसान झाले. पेट्रोल पंपावरील कर्मचारी घटनेने हादरले होते.
शुक्रवारी सायंकाळपासून पावसाने हजेरी लावली. त्यापूर्वी वातावरणातील उष्णतामानात मोठी वाढ झाली होती. आभाळ काळवंडून आले होते. दुपारी चारच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटाला सुरुवात झाली. महादेवनगर परिसरात मोकळ्या जागेत वीज कोसळली.
राजारामबापू कारखान्याच्या पेट्रोल पंपावरील जमिनीत डिझेल साठा असणाऱ्या परिसरात वीज पडल्याने मोठा आवाज झाला. तेथील कर्मचारी घाबरले होते. या घटनेनंतर शनिवारी पंपाचे कामकाज बंद ठेवण्यात आले. तेल कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी करून किती नुकसान झाले आहे, याची माहिती घेतली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
राजारामबापू दूध संघाच्या परिसरातील दूध भुकटी प्रकल्प इमारतीच्या कोप-यावर वीज कोसळून तेथील विविध उपकरणांचे अंदाजे २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती कार्यकारी संचालक बी. बी. भंडारी यांनी दिली. यामध्ये संघातील संगणक प्रणाली, दूरध्वनी, पावडर प्लँटमधील उपकरणांचे मोठे नुकसान झाले आहे.