सांगली : इलेक्ट्रॉनिक्स व्यवसायाला यंदा मोठा फटका बसला आहे. ऐन उन्हाळी मोसमातच लॉकडाऊन झाल्यामुळे व जूनपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असल्याने या काळात होणारा तब्बल २० कोटी रुपयांचा व्यवसाय बुडला आहे. पंखे, कूलर, वातानुकूलित यंत्रणा आदी माल मोठ्या प्रमाणावर दुकानात पडून आहे. त्याच्या विक्रीसाठी आता पुढील मोसमाची प्रतीक्षा व्यापाऱ्यांना करावी लागणार आहे.
जिल्ह्यात दरवर्षी उन्हाळ्यात सुमारे ३० ते ४० कोटींची उलाढाल होत असते. मार्चमध्ये काहीअंशी व्यावसाय झाला. मात्र, ज्या महिन्यात मोठी उलाढाल होते ते एप्रिल व मे हे दोन्ही महिने लॉकडाऊनमध्ये गेले. इलेक्ट्रॉनिक्स व्यावसायिकांना त्यांची दुकाने दोन महिने बंद करावी लागली. आता जूनपर्यंत ही दुकाने उघडण्याची चिन्हे नाहीत. जून महिना सुरू झाल्यानंतर पंखे, ए.सी. कूलर यांची विक्री होत नाही.
उन्हाळ्यातील व्यवसायाचा विचार करून येथील व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणावर माल मागविला होता. तो तसाच पडून आहे. त्याची विक्री होण्यासाठी तब्बल एक वर्ष त्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे व्यावसायिकांची चिंता वाढली आहे. मालामध्ये केलेली मोठी गुंतवणूक, त्यापोटी भरावा लागलेला कर, कामगारांचे पगार, विद्युत बिले, दुकान भाडे या सर्वांचा भारही त्यांना सोसावा लागणार आहे. त्यामुळे एकीकडे खर्च वाढत असताना व्यवसाय ठप्प झाल्याने व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे.
चौकट
कोट्यवधी रुपये अडकले
कोरोनाकाळात मागील वर्षभर बाजारपेठेचे स्वरूप बदलले आहे. उधारीवर कोणताही माल मिळत नाही. इलेक्ट्रॉनिक्स व्यवसायातही तीच स्थिती आहे. व्यावसायिकांना कोट्यवधी रुपये देऊन हा माल आणावा लागला. आता ही रक्कम पडून असलेल्या मालात अडकली आहे.
कोट
जिल्ह्यात दरवर्षी उन्हाळ्यात इलेक्ट्रॉनिक्स व्यवसायाची ५० कोटींची उलाढाल होत असते. तेवढा व्यावसाय थांबला आहे. एप्रिल व मे महिन्यांचा पंखे, ए.सी. व कूलरचा विचार केल्यास २० कोटींहून अधिकची उलाढाल ठप्प झाली आहे. पर्यायाने अन्य वस्तूंची विक्रीही थांबली आहे.
-विजय लड्डा, इलेक्ट्रॉनिक्स व्यावसायिक