दत्ता पाटील ।तासगाव : शहर स्वच्छतेचा एक वर्षाचा ठेका देण्यात आला. या वर्षाच्या कालावधित स्वच्छतेच्या ठेक्याविरोधात नागरिकांसह, नगरसेवकांतून तीव्र संताप व्यक्त झाला. सर्वच स्तरातून ठेक्याला विरोध असतानाही, वर्षाच्या ठेक्याला दीड वर्षापर्यंत मुदतवाढ देण्याचा कारनामा पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे या ठेक्यातच सत्ताधाºयांचा जीव गुंतला असल्याची चर्चा असून, ठेकेदाराला पायघड्या घातल्या जात असल्याचे चित्र काही निर्णयांतून दिसून आले आहे.
तासगाव नगरपालिकेतील सत्ताधाºयांकडून बीव्हीजीच्या ठेक्याची मुदत संपल्यानंतर, मुदतवाढ न देता नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. बीव्हीजीऐवजी शहरातीलच राष्टÑवादीच्या पदाधिकाºयाला ठेका देण्यात आला. मुळातच हा ठेका बोगस कागदपत्रे जोडून बेकायदेशीरपणे घेण्यात आला होता; मात्र सत्ताधाºयांकडूनच पायघड्या घालत ठेकेदाराची पाठराखण करण्यात आली. एक वर्षासाठी ठेका देण्यात आला.
या वर्षाच्या कालावधित सुरुवातीपासूनच नागरिकांकडून स्वच्छता होत नसल्याचा आरोप होऊ लागला. सहा महिन्यांच्या कालावधीनंतर तर नागरिकांनी प्रभागातील नगरसेवकांवर रोष व्यक्त करण्यास सुरुवात केली. त्यामुळे राष्टÑवादीसह भाजपच्या नगरसेवकांनीही या ठेक्याला उघडपणे विरोध करण्यास सुरुवात केली.
नगरसेवकांचा रोष वाढल्यानंतर ठेकेदाराला मुतदवाढ न देण्याचा निर्णय घेण्यात आला. अर्थात पालिकेची बदनामी होऊ लागल्याने खासदार संजयकाका पाटील यांना याची दखल घेत, ठेकेदाराला पाठीशी न घालण्याचे आदेश द्यावे लागले. ठेका रद्द करण्याचा निर्णय झाल्यानंतरही पालिकेतील पदाधिकाºयांनी ठेकेदाराला पाठीशी घालण्याचे उद्योग सुरूच ठेवले. पुन्हा निविदेचा विषय ऐरणीवर आल्यानंतर आठ-नऊ महिन्यांच्या कालावधीनंतर पुन्हा निविदा प्रक्रिया राबवण्यात आली.
सध्याचा ठेकेदार अकार्यक्षम असल्यामुळेच नव्याने निविदा प्रक्रिया झाली. मात्र त्यातही संबंधित वादग्रस्त ठेकेदाराने निविदा दाखल केली. इतकेच नव्हे, तर १५ टक्के कमी दराने निविदा दाखल केल्याने, दाखल तीन निविदांपैकी वादग्रस्त ठेकेदाराचीच निविदा कमी दराची निघाली. आता स्थायी समितीच्या सभेत या निविदेबाबत निर्णय होणार आहे.
स्वच्छतेचा ठेका एक वर्षाचा दिला होता. त्याची मुदत संपल्यानंतर, ठेका रद्द करण्याचा निर्णय झाल्यानंतरही वर्षाच्या ठेक्याला दीड वर्षाची मुदतवाढ देण्याचा कारनामा सत्ताधाºयांकडून करण्यात आला आहे. आता स्थायी समितीची सभा घेऊन तातडीने निर्णय घेण्याऐवजी ठेक्याचे घोंगडे भिजत ठेवण्यातच पदाधिकाºयांना इंटरेस्ट असल्याची चर्चा आहे. त्यामुळे लोकांचा विरोध असूनही, ठेका बदलण्याचे गाजर दाखवत ठेकेदाराला पोसण्याचे उद्योग सुरू आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.ठरावाचे : वरातीमागून घोडेतासगाव नगरपालिकेने स्वत:च्या मालकीचे दोन गारबेज कॉम्पॅक्टर आणि दहा घंटागाड्या खरेदी केल्या आहेत. ही वाहने स्वच्छता ठेकेदाराला भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय पालिकेच्या चार दिवसांपूर्वी झालेल्या सभेत घेण्यात आला. नियमानुसार पालिकेच्या सभेत या ठरावाला मंजुरी मिळाल्यानंतर, संबंधित ठेकेदारासोबत करार करूनच ही वाहने ठेकेदाराला हस्तांतरित करणे आवश्यक होते. किंबहुना अद्यापही पालिकेच्या आवारात दहा घंटागाड्या करार झाला नसल्याने उभ्या आहेत. मात्र पालिकेतील पदाधिकाºयांची ठेकेदारावरच मर्जी असल्याने ठराव होण्याच्या तीन महिने आधीच ठेकेदाराला गारबेज कॉम्पॅक्टर वापरण्यास देण्यात आले आहे. त्यामुळे पालिकेचे ठराव म्हणजे वरातीमागून घोडे असल्याचे बोलले जात आहे.