सांगली : कवठेमहांकाळ तालुक्यातील दहा गावांनी पथकर मुक्तीसाठी एल्गार पुकारला आहे. बोरगाव पथकर नाक्यापासून १० किलोमीटरच्या परिघातील गावांना पथकरातून सूट देण्याची मागणी पथकर मुक्ती कृती समितीने केली आहे.रत्नागिरी - नागपूर महामार्गावर बोरगाव पथकर नाक्याजवळच्या गावांना सध्या पास काढून प्रवास करावा लागतो. व्यावसायिक नसलेल्या छोट्या चारचाकी वाहनांना महिन्याला ३३० रुपयांचा पास घ्यावा लागतो. शेतीसाठीचे ट्रॅक्टर्स, प्रवासी वाहतूक करणारी वडाप वाहने यासह अन्य व्यावसायिक वाहनांना नियमाप्रमाणे पूर्ण पथकर द्यावा लागतो. नाक्यापलीकडे शेती असलेल्या एखाद्या शेतकऱ्याला शेतात खत टाकायचे असले, तरी पथकर भरुन पलीकडे जावे लागते. तासाभरात काम संपवून परतायचे असेल, तर दुहेरी पथकराची पावती फाडावी लागते. त्यासाठी फास्टॅग काढावा लागतो. तो नसेल, तर दंडासह पथकराची आकारणी होते.दैनंदिन कामानिमित्त दररोज पथकर नाक्यावरुन ये-जा करणाऱ्यांसाठी ही डोकेदुखीची बाब ठरली आहे. नाका उभारतानाच त्याला ग्रामस्थांनी विरोध केला होता. अन्यत्र उभारण्याची मागणी केली होती. त्यांचा विरोध डावलून नाका उभारला गेला. सातारा, पुणे जिल्ह्यांतील नाक्यानजिकच्या गावांनी संघर्ष करुन पथकर मुक्ती मिळविली आहे. काही ठिकाणी कागदोपत्री पथकर लागू असला, तरी स्थानिक दबावामुळे वसुली होत नाही. स्थानिक क्रमांक पाहून वाहन सोडले जाते. बोरगाव नाक्यावर मात्र तशी स्थिती नसून सक्तीने वसुली होते.सोमवारी शिरढोणमध्ये बैठकयाला विरोधासाठी कृती समितीने सोमवारी (दि. १२) शिरढोण (ता. कवठेमहांकाळ) येथे शेतकरी व ग्रामस्थांची बैठक आयोजित केली आहे. पथकर मुक्तीसाठी आंदोलनाची दिशा यावेळी निश्चित केली जाईल. यावेळी कृती समितीतर्फे दिगंबर कांबळे, अवीराजे देशमुख, सचिन करगणीकर, बाळासाहेब रास्ते, अरुण भोसले, अनिल परीट, दिगंबर भोसले आदी भूमिका मांडणार आहेत.
या गावांना बसतो भुर्दंडपथकर नाक्याच्या १० किलोमीटरच्या परिघात असलेल्या बोरगाव, गव्हाण, जायगव्हाण, देशिंग, नृसिंहगाव, कुची, हरोली, मळणगाव, अलकूड आदी गावांना पथकराचा भुर्दंड बसत आहे. गेल्या १० महिन्यांपासून पथकराचा जाच सोसत आहेत. दरवर्षी त्यामध्ये वाढ होते.