अशोक पाटील -- इस्लामपूर मागील विधानसभा, जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकीत मी नवखा होतो. आता जिल्ह्याच्या राजकारणात चांगलाच मुरलो आहे. केंद्रात आणि राज्यात आपली सत्ता आहे. भिण्याचे कारण नाही. आगामी सर्वच निवडणुकीत विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीला लोळवू. या लढाईत कोणाची गद्दारी खपवून घेतली जाणार नाही. आपल्याबरोबर राहतील ते मावळे, जे जातील ते कावळे’, असे खडे बोल खासदार राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीविरोधी असलेल्या सर्वच नेत्यांना सुनावले.वाळवा, शिराळ्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेवर राष्ट्रवादीचे म्हणजेच माजी मंत्री जयंत पाटील यांचे वर्चस्व आहे. जयंत पाटील यांना राजकीय शत्रू मानून पेठनाक्यावरील महाडिक गटाचे युवा नेते, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल महाडिक यांच्या समर्थकांनी वाळवा, शिराळा, मिरज, शाहुवाडी आणि हातकणंगले या तालुक्याच्या सीमेवर असलेल्या येलूर जिल्हा परिषद मतदारसंघातील पुणे-बेंगलोर महामार्गावरील येलूर येथे राहुल महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्ताने राष्ट्रवादी वगळून सर्वपक्षीय मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात आगामी निवडणुकीचे रणशिंग फुंकले. यावेळी शेट्टी यांनी भाजप, शिवसेना, कॉँग्रेस, महाडिक गटासह इतर पक्षांनी एकत्र करून राष्ट्रवादीपुढे आव्हान उभे करण्याचा सल्ला दिला. गद्दारी करणाऱ्यांना बाजूला सारून पुढे जाण्यासाठी कार्यकर्त्यांनाकडक शब्दात सुनावले. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीसह, इस्लामपूर व आष्टा पालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. राष्ट्रवादीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून विकासकामांचा डांगोरा पिटण्यास सुरुवात केली आहे. ही कामे निकृष्ट कशी आहेत, यामध्ये किती भ्रष्टाचार आहे, याचा सात-बारा काढण्यासाठी विरोधक सरसावले आहेत. परंतु या विरोधकांत एकमत नाही. त्यामुळे राष्ट्रवादीने विरोधकांना बेदखल करून टाकले आहे.आगामी इस्लामपूर पालिका निवडणुकीसाठी विद्यमान नगरसेवक कपिल ओसवाल, सतीश महाडिक, अमित ओसवाल, जलाल मुल्ला, चेतन शिंदे, सोमनाथ फल्ले, अॅड. फिरोज मगदूम यांनी महाडिक युवा शक्तीकडून निवडणूक लढविण्याची तयारी दाखविली आहे. दुसरीकडे भाजपचे विक्रम पाटील, शिवसेनेचे आनंदराव पवार, कॉँग्रेसचे वैभव पवार, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबा सूर्यवंशी त्यांच्यातील राजकीय दुरावा आजही कायम आहे. सर्वांना समान अंतरावर ठेवत माजी नगरसेवक एल. एल. शहा यांनीही पालिका निवडणुकीत उतरण्याचे निश्चित केले आहे. गत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत केंद्रात आणि राज्यात आघाडी कॉँग्रेसचे सरकार होते. परंतु स्थानिक पातळीवरील निवडणुकीत कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे निवडणुका लढविल्या. परिणामी शिराळा मतदारसंघात शिवाजीराव नाईक यांनी विकास आघाडी करून आघाडी कॉँग्रेसला तिसरा पर्याय उभा केला होता. त्यामुळे काही जि. प. मतदारसंघात कॉँग्रेस, राष्ट्रवादीला धक्का बसला. वाळवा तालुक्यात राष्ट्रवादीविरोधात कॉँग्रेस अशाच लढती झाल्या. भाजप, शिवसेनेला स्थानिक स्वराज्य संस्थेत शिरकावही करता आला नाही. त्यानंतर मोदी लाटेने केंद्रात व राज्यात भाजपचे वारे आले. यामध्ये घटक पक्षाच्या रूपाने राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत सत्तेत जाऊन बसले. परंतु या दोघांचे कार्यक्षेत्र असलेल्या वाळवा, शिराळ्यातील राष्ट्रवादीला धक्का देण्यासाठी आजही विरोधकांची ताकद एकवटली नसल्याचे चित्र आहे.
‘मिशन इस्लामपूर’साठी येलूरमध्ये एल्गार
By admin | Published: September 30, 2016 1:07 AM