लोकमत न्यूज नेटवर्ककुपवाड : सांगलीतील औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) विभागीय कार्यालय सोलापूरला स्थलांतरित करण्याचा घाट घातल्याबद्दल सांगली जिल्ह्यातील वातावरण तापले आहे. उद्योजकांनी पालकमंत्र्यांच्या या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. पालकमंत्र्यांनी सोलापूरला नव्याने स्वतंत्र विभागीय कार्यालय सुरू करावे. येथील कार्यालय आहे तसेच ठेवावे. त्यांना सोलापूरला स्वतंत्र कार्यालय करण्यास आमचा पाठिंबाच आहे. पालकमंत्र्यांनी सांगलीतील कार्यालय स्थलांतरित करण्याचा प्रयत्न कोणत्याही परिस्थतीत करू नये. कार्यालय स्थलांतरित करण्याचा प्रयत्न झाल्यास उद्योजकांना बरोबर घेऊन जोरदार आंदोलन उभारण्याचा इशाराही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी दिला.सांगली जिल्ह्यात वसंतदादांनी सहकारी, औद्योगिक वसाहतीबरोबरच एमआयडीसीचे औद्योगिक क्षेत्र रूजविले. त्यानंतर जिल्ह्यात आजतागायत तेरा औद्योगिक वसाहती निर्माण झाल्या आहेत. यामध्ये कुपवाड, मिरज, इस्लामपूर, विटा, कडेगाव, जत, शिराळा, पलूस, शाळगाव या एमआयडीसींचा प्रामुख्याने समावेश आहे. तसेच कवलापूर, सिध्देवाडी, अलकूड-मणेराजुरी या एमआयडीसीही प्रस्तावित आहेत, तर सोलापूर जिल्ह्यात सात औद्योगिक क्षेत्रे कार्यरत आहेत, तर पाच प्रस्तावित आहेत. त्यामुळे सांगली जिल्हा हा सोलापूरपेक्षा अधिक आघाडीवर आहे. तसेच जिल्ह्यातून चार महामार्ग जाणार असल्यानेही उद्योगवाढीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील एमआयडीसीचे विभागीय कार्यालय सोलापूरला स्थलांतरित करणे किंवा कोल्हापूरला जोडण्याचा प्रकार अत्यंत चुकीचा होणार आहे, अशी प्रतिक्रिया जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली आहे. त्यांनी उद्योजकांच्या बरोबरीने कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यातील एमआयडीसीचे विभागीय कार्यालय पालकमंत्र्यांना स्थलांतरित करू न देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. जिल्ह्यातील उद्योजकांमधून या निर्णयाचे संतप्त पडसाद उमटले आहेत. हा निर्णय रद्द करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.विभागीय कार्यालयात : ही कामे होतात...सांगली जिल्ह्यात तेरा एमआयडीसी कार्यरत आहेत. या जिल्ह्यातील उद्योजकांची या विभागीय कार्यालयाअंतर्गत अत्यंत महत्त्वाची कामे होतात. त्यामध्ये प्लॉट वाटप, लीज डीड, प्लॉट ट्रान्सफर, करारपत्रे अशी महत्त्वाची कामे केली जातात. ही कामे उद्योजकांच्यादृष्टीने अत्यंत अडचणीची असतात. त्यामुळे कार्यालयाचे स्थलांतर झाल्यास किंवा हा जिल्हा अन्य जिल्ह्यास जोडल्यास उद्योजकांची गैरसोयच अधिक होणार आहे. उद्योजकांना उद्योग सोडून अन्य जिल्ह्यात हेलपाटे मारणे परवडणारे नाही, असे उद्योजकांनी सांगितले.मुंबईत उद्या बैठकसांगलीतील औद्योगिक विकास महामंडळाचे विभागीय कार्यालय सोलापूरला स्थलांतरित करण्यासंदर्भात मुंबईत मंत्रालयात बुधवारी १३ रोजी सकाळी ११ वाजता बैठक आयोजित केली आहे. ही बैठक पालक मंत्री सुभाष देशमुख यांनी उद्योग विभागाला दिलेल्या लेखी निवेदनावरून बोलाविण्यात आली आहे. या बैठकीत सांगलीतील कार्यालय सोलापूरला स्थलांतरित करण्याचा निर्णय होणार आहे किंवा सांगली जिल्हा हा कोल्हापूरला जोडण्यासंदर्भात निर्णय होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील औद्योगिक संघटनांमधून नाराजी पसरली आहे. हा निर्णय रद्द करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.विट्यातील उद्योजकांचा कार्यालय स्थलांतरास विरोधविटा : सांगली येथील उद्योग भवनमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले महाराष्टÑ औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) विभागीय कार्यालय सोलापूर येथे स्थलांतरण करण्यास जिल्ह्यातील उद्योजक व संघटनांनी विरोध केला असून, सांगलीचे कार्यालय सोलापूरच नव्हे, तर कोठेही स्थलांतर केल्यास एकत्रित तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती विटा यंत्रमाग संघाचे अध्यक्ष किरण तारळेकर यांनी दिली. याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले असल्याचेही तारळेकर यांनी सांगितले. तारळेकर म्हणाले, विभागीय कार्यालय सोलापूरला स्थलांतरित करण्याचा शासनस्तरावर विचार सुरू आहे. मात्र, असे केल्यास सांगली जिल्ह्यातील औद्योगिक वाढीवर याचा मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे हे कार्यालय सोलापूरला स्थलांतरित करण्यास उद्योजक व औद्योगिक संघटनांनी तीव्र विरोध केला असून, शासनाने याबाबत दि. १३ रोजी मंत्रालयात होणाºया बैठकीत स्थलांतराचा निर्णय घेऊन नये, अन्यथा आम्हाला यापुढे आंदोलनासारखे हत्यार हाती घ्यावे लागेल.
उद्योजकांमध्ये पालकमंत्र्यांबद्दल नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 11:10 PM