इस्लामपूर : बोरगाव (ता. वाळवा) येथील मारुती ऊर्फ तात्या पाटील बिगरशेती सहकारी पतसंस्थेत २ कोटी ४८ लाख रुपयांचा अपहार झाल्याची घटना उघडकीस आली. या अपहारप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि वसुली अधिकाऱ्यांसह १५ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फसवणुकीचा प्रकार एप्रिल १७ ते मार्च २१ या कालावधीत घडला.याबाबत सहकारी संस्थेचे अप्पर लेखापरीक्षक राजेंद्र भगवान पाटील यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार पतसंस्थेचा अध्यक्ष स्नेहलकुमार मानसिंग पाटील, उपाध्यक्ष प्रकाश आनंदराव पाटील, सचिव अरविंद जनार्दन पाटील, वसुली अधिकारी प्रकाश गणपती पवार याच्यासह संचालक संग्राम जीवन पाटील, संतोष गोविंद साटपे, विशाल प्रकाश पवार, रूपेश सुरेश तिरमार, जगदीश मोहिते, विकास भीमराव पाटील, तानाजी गणपती गिरीगोसावी, धैर्यशील भास्कर चाचे, प्रवीणकुमार शिंदे, विश्वनाथ पांडुरंग इंगवले आणि लिपिक जालिंदर महादेव पाटील (सर्व रा. बोरगाव) अशा १५ जणांविरुद्ध २ कोटी ४७ लाख ६२ हजार ६१ रुपयांची फसवणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बोरगाव येथील मारुती ऊर्फ तात्या पाटील पतसंस्थेत पदाधिकारी आणि कर्मचारी म्हणून काम करीत असताना वरील सर्वांनी संगनमत करून स्वत:च्या फायद्याकरिता संस्थेतील शिल्लक रकमेचा गैरवापर केला आहे. कर्जवसुलीच्या रकमा किर्दीस जमा केलेल्या नाहीत. कर्जदारांकडून कपात करून घेतलेल्या रकमा जमा नाहीत.
कर्जरोखे गहाळ करणे, जादा रक्कम अदा करून त्यामध्ये अपहार करणे, कागदपत्रांमध्ये खाडाखोड करणे यांसह इतर अनेक पद्धतींनी वरील सर्वांनी सभासदांच्या ठेवी स्वरूपातील पैशाचा अपहार करून त्यांची फसवणूक केली आहे. सहायक पोलिस निरीक्षक वरुटे हे अधिक तपास करीत आहेत.संस्थेमधील पैसे युनिव्हर्सल ब्रेव्हरिजमध्येयुनिव्हर्सल ब्रेव्हरिज या मिनरल वॉटर कंपनीतील गुंतवणुकीवर २४ टक्के व्याजदराचे आमिष दाखवत या संस्थेतील पैसा या प्रकल्पाकडे वळविला आहे. या गुन्ह्यात कृष्णा कारखान्याचे माजी संचालक मानसिंग मारुती ऊर्फ बाळनाना पाटील यांच्यासह त्यांची मुले स्नेहलकुमार, जितेंद्र मानसिंग पाटील यांचा समावेश आहे. या गुन्ह्यात संदीप पाटील या ठेवीदाराने पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यामध्ये १ कोटी २१ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे म्हटले आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेमार्फत सुरू आहे.