पलूस : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या येथील औद्योगिक वसाहत शाखेत दोन लाख ५२ हजार ४३३ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन शाखाधिकारी बाळासाहेब नारायण सावंत (रा. शिरटे, सध्या रा. इस्लामपूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा बँकेचे लेखापाल विक्रांत लाड यांनी याबाबत पलूस पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.संशयित आरोपी बाळासाहेब सावंत हे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पलूस शाखेत शाखाधिकारी म्हणून कार्यरत होते. एक ऑगस्ट २०२२ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत बँकेतील खातेदारांच्या खात्यावरील २ लाख २५ हजार ३६३ रुपये स्वत:च्या व इतर खात्यांवर वर्ग केले. तसेच वीज बिल ग्राहकांकडून आणि सोने तारण कर्जदारांनी जमा केलेले २७ हजार ७० रुपयांची रक्कम स्वत:कडेच ठेवली. एकूण २ लाख ५२ हजार ४३३ रुपयांचा अपहार शाखाधिकारी सावंत यांनी केला. बँकेच्या लेखापरीक्षणात ही गंभीर बाब पुढे आली आहे. या अपहारप्रकरणी लेखापाल लाड यांना संशयित शाखाधिकारी सावंत यांच्याविरुद्ध पलूस पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकारी यांनी दिले. त्यानुसार लाड यांनी पलूस पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सावंत यांच्याविरुद्ध बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. लवकरच त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
सांगली जिल्हा बँकेच्या पलूस शाखेत अडीच लाखांचा अपहार, तत्कालीन शाखाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2024 12:30 PM