आटपाडी : येथील रसरशीत लालभडक आणि गुणवत्तापूर्ण डाळिंबांचा मोह आता परदेशातील व्यापाºयांनाही होत आहे. आटपाडीतून डाळिंब खरेदी करून त्यांची थेट जगभर निर्यात करण्यासाठी मंगळवारी हॉलंडमधील दोन व्यापाºयांनी भेट देऊन पाहणी केली. पुढच्याच महिन्यापासून त्यांनी डाळिंबांची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.मेटा आणि लक्ष्मी अशी या व्यापाºयांची नावे आहेत. सध्या हे व्यापारी भारतातून युरोपात मासे निर्यात करीत आहेत. मोरोक्को आणि इस्राईल या देशातून डाळिंब खरेदी करून ते जगभर पाठवत आहेत. त्यांना आटपाडीतील गुणवत्तापूर्ण डाळिंबांची माहिती मिळाली आणि त्यांनी थेट आटपाडी गाठली. आटपाडीतून डाळिंबे खरेदी करून युरोप, जपान, जर्मनी, बेल्जियम, अमेरिका या देशांमध्ये ते निर्यात करणार आहेत.त्यांनी बनपुरी, खांजोडवाडी, आटपाडी येथील डाळिंब बागांना भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीस भेट दिली. इथली गुणवत्तापूर्ण डाळिंबे पाहून त्यांनी जानेवारीपासूनच डाळिंबे खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब गायकवाड, शशिकांत जाधव, बी. डी. मोहिते, दत्तात्रय स्वामी, एस. जे. चंदनशिवे उपस्थित होते.
आटपाडीच्या डाळिंबाची परदेशी व्यापाऱ्यांना भुरळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2018 11:50 PM