संजयकुमार चव्हाण ल्ल मांजर्डेतासगाव तालुक्यातील मांजर्डे जिल्हा परिषद मतदार संघामध्ये दिग्गजांना निवडणुकांचे वेध लागले आहेत. नगरपालिका निवडणुकीतील विजयाने आत्मविश्वास वाढलेल्या खासदार संजयकाका पाटील व माजी आमदार सदाशिवराव पाटील गटाने या भागात बैठकांचा जोर लावला आहे. आमदार अनिल बाबर व आमदार सुमनताई पाटील यांनी कार्यकर्त्यांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनाही मैदानात उतरणार आहे. खरी लढत आबा-काका गटामध्येच होणार आहे.मांजर्डे जिल्हा परिषद गट मागासवर्गीय पुरुषांसाठी आरक्षित असून, पंचायत समितीच्या मांजर्डे व पेड गणामध्ये सर्वसाधारण महिला असे आरक्षण आहे.मांजर्डे गट आरक्षित झाल्याने दिग्गजांची दांडी उडाली आहे. राष्ट्रवादीकडून माजी पंचायत समिती सदस्य किसन शेंडगे यांचे नाव चर्चेत असले तरी, नवीन चेहराही दिला जाऊ शकतो. भाजपकडून पेडचे गणपती संघाचे संचालक सुधाकर शेंडगे, प्रमोद शेंडगे व स्वप्नील शेंडगे यांची नावे चर्चेत आहेत. शिवसेनेकडून मांजर्डेचे माजी सरपंच नवनाथ जाधव यांचे नाव पुढे आले आहे.मांजर्डे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असला तरी, भाजपने या भागात ग्रामपंचायतीत मुसंडी मारली आहे. त्यामुळे भाजप व राष्ट्रवादीत चुरस होईल. मांजर्डे पंचायत समिती गणासाठी यावेळी भाजपमधून मांजर्डेचे सचिन पाटील, आरवडेचे संदीप पाटील किंवा बालाजी पाटील यांच्या पत्नीची नावे चर्चेत आहेत, तर राष्ट्रवादीकडून आरवडेचे माजी पंचायत समिती सदस्य युवराज पाटील यांच्या पत्नीचे नाव आघाडीवर आहे. मांजर्डेचे मोहन पाटील हेही पत्नीसाठी आग्रही आहेत. त्यामुळे भाजप व राष्ट्रवादीमध्ये काट्याची लढत होईल. काँग्रेस व शिवसेना तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना सवतासुभा मांडणार, का भाजपबरोबर युती करणार, याबाबत साशंकता आहे.मांजर्डे गटात चिंचणी गटातील काही गावांचा समावेश झाला आहे, तर वायफळे, यमगरवाडी ही गावे सावळज गटामध्ये विलीन केली आहेत. बदललेल्या रचनेमुळे राजकीय समीकरणे बदलली आहेत.मांजर्डे गट राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असला तरी, माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर या गटाची पडझड झाली असल्याने, आमदार सुमनताई पाटील यांना जोरदार प्रयत्न करावे लागणार आहेत. खासदार पाटील यांच्या संपर्कात अनेकजण असल्याची चर्चा आहे. त्यामुळे बरीच उलथापालथ होईल असे चित्र आहे. आमदार बाबर यांचीही चाचपणी सुरु आहे. त्यांना या भागामध्ये कार्यकर्त्यांचे जाळे तयार करण्यात अजूनही यश आलेले नाही. माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनाही धडपड करावी लागणार आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीत खासदार पाटील यांनी तासगावात व माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी विट्यात यश मिळविल्याने, हा विजयरथ तसाच पुढे नेण्याचा प्रयत्न दोन्ही नेत्यांचा आहे. नगरपालिकेत झालेला पराभव आमदार सुमनताई पाटील व आमदार बाबर यांच्या जिव्हारी लागला असून, त्या पराभवाचे उट्टे येत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काढण्याचा प्रयत्न ते करतील.
मांजर्डेसाठी गावा-गावात बैठकांना जोर
By admin | Published: January 24, 2017 12:56 AM