सांगली : जिल्हा परिषदेतील पशुसंवर्धन विभागाकडील लिपिक वसंत लांगे यांना पशुसंवर्धन समितीच्या सभापती मनीषा पाटील यांचे पती तानाजी पाटील यांनी बुधवारी दमदाटी केल्या प्रकरणाचा वाद आता पेटला आहे. याप्रकरणी तानाजी पाटील यांनी माफी मागावी, या मागणीसाठी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी काम बंद आंदोलन पुकारले आहे. या मागणीसाठी जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला अधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे.पशुसंवर्धन कर्मचारी लांगे यांना तानाजी पाटील यांनी सभेचे इतिवृत्त पूर्ण न केल्याबद्दल शिवीगाळ करुन दमदाटी केल्याप्रकरणी गुरुवारी कर्मचारी संघटनांची जिल्हा परिषदेमध्ये बैठक झाली. या बैठकीला सुभाष मरीगुद्दे, एस. आर. पाटील, दादासाहेब पाटील, पी. ई. जगताप, नीलकंठ पट्टणशेट्टी, एस. एन. वीर, अशोक पाटील, विजय डांगे, फिरोज शेख, म्हळाप्पा गळवी आदी उपस्थित होते. शिवीगाळ व दमदाटीबाबत तानाजी पाटील यांनी जाहीर माफी मागावी, भविष्यात असे प्रकार होणार नाहीत, याची हमी जिल्हा प्रशासनाने द्यावी, या मागण्या मान्य न झाल्यास २७ जूनपासून जिल्हा परिषद, पंचायत समिती स्तरावरुन तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. (प्रतिनिधी)
कर्मचाऱ्यांकडून आज जिल्हा परिषद बंद
By admin | Published: June 25, 2015 10:55 PM