दत्ता पाटील तासगाव : तासगाव नगरपालिकेतील कारभाराची सातत्याने चर्चा सुरू असतानाच, निम्माअर्धा कालावधी पूर्ण केलेल्या कारभाऱ्यांनी विकास कामातून स्वत:चे कोटकल्याण करण्यासाठी कंबर कसली आहे. प्रभागातील विकासकामे बगलबच्च्यांच्या नावावर घेण्यासाठी सत्ताधारी नगरसेवकांनी कंबर कसली असून, ठेकेदारांच्या नावावर कारभाऱ्यांच्या ठेकेदारीचा धुरळा सुरू असल्याचे चित्र तासगाव शहरात दिसून येत आहे. अतिलालसेमुळे निकृष्ट दर्जाची कामे होत असून, लाखो रुपयांचा निधी कुचकामी ठरत आहे.तासगाव शहरात विकास कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च होत आहे. खर्चाची व्याप्ती इतकी मोठी आहे की, पालिकेची तिजोरीदेखील रिकामी झाली आहे. अर्थात निधी खर्च करून शहराचा कायापालट करण्यासाठी कारभाऱ्यांचा आटापिटा नसून, नगरसेवक म्हणून मिळालेल्या संधीचे सोने करून स्वत:चा कायापालट करण्याचा सत्ताधारी कारभाऱ्यांचा प्रयत्न सुरु आहे.
काही ठेकेदारांवर दबाव टाकून, काही ठेकेदारांनाच हाताशी धरुन, तर काही नगरसेवकांनी पै-पाहुण्यांसह नातेवाईकांनाच ठेकेदार करून तासगाव शहरात विकास कामांचा धडाका लावला आहे. सत्तेची सूत्रे हातात असल्याने स्वत:च्या प्रभागातील कामे स्वत:च्या भूमिकेनुसार निश्चित करून कामे केली जातात. अपवादाने काम मिळालेच नाही, तर थोडीशी खदखद, नाराजी व्यक्त करून काम पदरात पाडून घेतले जाते.
नियमानुसार काम केले, तर मलिदा मिळणार नसल्याने, सर्व नियम धाब्यावर बसवूनच कामे केली जातात. प्रशासनावर दबाव टाकून, दबावाला बळी पडत नसेल, तर सभेत टार्गेट करून स्वत:ची सोय करण्याचा राजरोस उद्योग सध्या तासगाव शहरात सुरू आहे.शहरातील कोट्यवधी रुपयांची विकासकामे ठराविक मर्जीतील आणि नात्यातील ठेकेदारांना देण्यात आली आहेत. काही दिवसांपूर्वी शहरातील भुयारी गटार योजनेचे काम नियमानुसार होत नसल्याची कबुली थेट संबंधित ठेकेदारांनीच त्यावेळी दिली होती.नुकतेच डी. एम. पाटील शॉपिंग सेंटरच्या डागडुजीच्या कामावर सुमारे पंधरा लाख रुपये खर्ची टाकण्यात आले आहेत. या कामाचे बिल निघण्यापूर्वीच, काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे चव्हाट्यावर आले आहे. याबाबत राष्ट्रवादीचे नगरसेवक अभिजित माळी यांनी आक्षेप घेत चौकशीची मागणी केली आहे.पालिकेच्या कारभारात आतापर्यंत प्रत्येकवेळी तक्रार झालेले काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे दिसून आले आहे. तक्रार न झालेल्या कामाच्या दर्जाबाबतही साशंकता आहे. निकृष्ट आणि बोगस कामे करून स्वत:ची तुंबडी भरण्याचे कारनामे पालिकेत राजरोस सुरु आहेत. किंबहुना लोकांची सेवा नव्हे, तर पालिकेतून मेवा घेण्यासाठीच निवडून आल्याचा आविर्भाव अनेक नगरसेवकांचा आहे.त्यामुळे तासगाव नगरपालिकेतून खर्ची पडत असलेल्या कोट्यवधी रुपयांतून जनतेचे कल्याण होत आहे, की कारभाऱ्यांचे कोटकल्याण होत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. काम एकाचे, करणार दुसरा आणि मलई तिसऱ्याला, असा अजब कारभाराचा नमुना तासगाव नगरपालिकेत सुरु असून, सत्तेची पाच वर्षे संपताना तरी कारभाऱ्यांच्या ठेकेदारीचा धुरळा संपणार का? असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.