सांगली : कंत्राटी वीज कामगारांच्या संयुक्त कृती समितीने कामगारांच्या मागण्यांसाठी दि. २८ फेब्रुवारीपासून दोन दिवस संपावर गेले आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे जिल्ह्यातील वीज यंत्रणा सलाइनवर आहे. सांगली, मिरज शहरांतील कर्मचाऱ्यांनी विश्रामबाग येथील महावितरणच्या कार्यालयासमोर निदर्शने करून धरणे आंदोलन केले; तसेच शासनाने आंदोलनावर तोडगा काढला नाही तर ५ मार्चपासून बेमुदत काम बंदची हाक दिली आहे.वर्कर्स फेडरेशनचे सरचिटणीस कॉ. महेश जोतराव, वर्कस कंत्राटी फेडरेशन कामगार सेल राज्य सचिव दत्ता पाटील, मागासवर्गीय कामगार संघटनेचे ढोमके, कंत्राटी कामगार महासंघाचे गणेश पाटील, मागासवर्गीय कंत्राटी कामगार संघटनेचे विशाल कोळी यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी महावितरणच्या विश्रामबाग कार्यालयासमोर निदर्शने करून दिवसभर धरणे आंदोलन केले. महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या कंपन्यांतील कंत्राटी कामगारांनी पहिल्या टप्प्यात २८ फेब्रुवारीपासून ४८ तास व दुसऱ्या टप्प्यात ५ मार्चपासून बेमुदत काम बंदची नोटीस तिन्ही कंपनी प्रशासनाला दिली होती. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर तिन्ही कंपनी व वीज कंत्राटी कामगारांच्या संयुक्त कृती समितीची बैठक झाली. या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नसल्यामुळे जिल्ह्यातील सर्व कंत्राटी वीज कर्मचारी मंगळवारीपासून संपावर गेले होते. गुरुवारी सायंकाळी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेऊन कामावर हजर झाले आहेत; पण तिन्ही वीज कंपनीच्या प्रशासनाने कंत्राटी वीज कामगारांच्या प्रश्नाबाबत ठोस निर्णय घेतला नाही तर ५ मार्च २०२४ पासून बेमुदत काम बंदची हाक आंदोलकांनी दिली आहे.
वीज कंपन्यांतील कंत्राटी कामगारांच्या मागण्या
- तिन्ही वीज कंपन्यांतील रिक्त पदांवर कंत्राटी कामगारांना सामावून घ्या.
- कंत्राटी कर्मचारी स्थायी होईपर्यंत तेथे नियमित पदभरती करू नका.
- कंत्राटी कामगारांच्या एकूण पगारात १ एप्रिलपासून ३० टक्के वाढ करा.
- मनोज रानडे समितीच्या अहवालातील शिफरशींची तातडीने अंमलबजावणी करा.
- कंत्राटी कामगारांना वयाच्या ६० वर्षापर्यंत कंत्राटदारविरहित शाश्वत रोजगार द्या.
- कंत्राटी कर्मचाऱ्यांना स्थायीप्रमाणे ‘समान काम, समान वेतन’ द्या.