इस्लामपूर : अस्तित्वाचे प्रश्न दडपले जात आहेत, जगण्याशी जोडलेले शिक्षण, रोजगाराच्या अधिकाराचे प्रश्न दाबले जात आहेत, अशावेळी अस्तित्वाला धोक्यात आणणाºया सत्तेविरुध्द आणि जाती-धर्माच्या नावाखाली सुरू असलेल्या राजकारणाला आव्हान देण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी येथे केले.
२८ राज्ये आणि ६३ दिवसांच्या दांडी ते दिल्लीदरम्यान निघालेल्या संविधान सन्मान यात्रेचे इस्लामपूर येथे सोमवारी सकाळी आगमन झाले. येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर झालेल्या संवाद सभेत त्या बोलत होत्या. माजी प्राचार्य विश्वास सायनाकर, कॉ. धनाजी गुरव, प्राचार्य डॉ. एच. टी. दिंडे, सुभाष पाटील, बी. जी. पाटील, रविकांत तुपकर, के. डी. शिंदे, कृष्णकांत, डॉ. रवींद्र व्होरा, सयाजी मोरे उपस्थित होते.मेधा पाटकर म्हणाल्या की, आपला सूर आशेचा, विश्वासाचा आहे. राज्यघटनेने दिलेले अधिकार व सुरक्षा मिळते आहे का, हे पाहिले पाहिजे. परंतु नेमके हेच अधिकार व सुरक्षा नाकारली जात आहे. भांडवलदार सत्ता गाजवत आहेत, त्यांचे हित जपले जात आहे.
सरकारने अतिशय संघर्षातून निर्माण झालेला भूसंपादन कायदा दडपून टाकला. केंद्रीय कायदा बाजूला ठेवून संसाधने लुटली जात आहेत. अंबानी-अदाणींना कोट्यवधी रुपये देऊन परदेशात ठेके मिळवून दिले जात आहेत; पण त्याविषयी कोण बोलणार? पर्यायी विकासासाठी सुरू असलेले खोटे अर्थकारण सर्वांनी मिळून हाणून पाडले पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेले आदर्श जपण्यासाठी एकत्र यावे. ते काम केवळ दलितांचे नव्हे, तर सर्व श्रमिकांचे आहे.
त्या म्हणाल्या की, संविधानाचा अधिकार मानवी अधिकार आहे. आपल्या लोकशाहीत स्थानिक स्वराज्य संस्थांना महत्त्व दिले नाही तर, आपण जाब विचारला पाहिजे. सामान्यांचे प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर जोडले जातात, तर आपणही सावध झाले पाहिजे. शेतकºयांना हमीभाव मिळविण्यासाठी लढावेच लागेल. स्वामिनाथन् आयोगाची अंमलबजावणी का केली जात नाही? विभाजनवादी राजकारण अमान्य करून आपणाला अन्यायाविरोधात बोललेच पाहिजे.
माजी प्राचार्य विश्वास सायनाकर यांनी विविध प्रदेशातून आलेल्या बहुभाषिक कार्यकर्त्यांना वाळवा तालुक्याचा इतिहास हिंदी भाषेतून सांगितला. दीपक कोठावळे यांनी प्रास्ताविक केले. विकास मगदूम यांनी आभार मानले. शरद कांबळे, सागर जाधव, उमेश कुरळपकर, आबा पाटील, सुयश पाटील, सचिन पवार यांनी संयोजन केले.भाजपची भाषणबाजीस्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर म्हणाले की, सध्या देशात फक्त भाषणबाजी सुरू आहे. संविधान यात्रेत सर्व कष्टकरी, शेतकरी सोबत राहतील. देशात सत्ताधाºयांच्या खुर्च्या धोक्यात आहेत, त्यामुळेच ते जाती-धर्मात भांडणे लावत आहेत.