कुरळप : महिलांसाठी स्त्री शिक्षणाची क्रांती सावित्रीबाई फुले यांनी घडवुन आणली. त्यामुळे आज महिला उच्चशिक्षण घेत आहे. त्यांना अधिक सक्षम करण्याची जबाबदारी समाजाची आहे, असे मत निर्भय पथकाच्या भारती साळुंखे यांनी व्यक्त केले. ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथील वारणा शिक्षण संकुलातील महाविद्यालयात महिला दिनानिमित्त विद्यार्थिनींनी महिला मेळावा आयोजित केला होता. यावेळी त्या बोलत होत्या. प्रा. भारती पाटील अध्यक्षस्थानी होत्या.
भारती साळुंखे म्हणाल्या की पन्नास टक्के महिला उच्चपदे हस्तगत करतील आणि पुरुषही जेव्हा चूल आणि मूल ही जबाबदारी इतर कामांबरोबर निष्ठेने सांभाळतील तेव्हा स्त्री-पुरुष समानतेचे मृगजळ वास्तविक जीवनात अस्तित्वात येईल. स्त्रियांनी सत्तेच्या अग्रस्थानी असले पाहिजे. समाजामध्ये स्त्रियांच्या प्रगतीसाठी अनेक उपाययोजना असूनही त्यांचा सर्वार्थाने उपयोग करून घेत नाहीत. स्वतःमध्ये असणाऱ्या सुप्तगुणांना ओळखण्यास कमी पडतात. ही पराभूत वृत्ती केवळ पालकांच्या व शिक्षकांच्या सुसंस्कारानेच बदलू शकते.