संंख : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जत येथील श्री यल्लमादेवी यात्रेसाठी आरक्षित असलेल्या जागेवर धनदांडग्यांचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण सुरू आहे. यामुळे देवीची यात्रा भरविण्यात अडचणी येणार असल्याने भाविकांमधून संताप व्यक्त हाेत आहे.
जत येथील यल्लमादेवी ही जत नगरीची ग्रामदेवता आहे. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. खिलार जनावरांची मोठी यात्रा येथे भरते. दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात मोठी यात्रा भरते. यल्लमादेवी मंदिर हे जतच्या डफळे राजघराण्याचे खासगी देवस्थान आहे. सौंदत्ती यल्लमा ते कोकटनूर, जत अशी देवीची मोठी महती आहे. पूर्वी जत संस्थानामार्फत यात्रा भरविली जात होती. त्यानंतर ही यात्रा जत ग्रामपंचायतीच्यावतीने भरविण्यात येत होती. सध्या ही यात्रा श्री यल्लमादेवी प्रतिष्ठानच्या माध्यमातून भरते. यात्रेसाठी तत्कालीन जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी १५० एकर जागा श्री यल्लमादेवी यात्रेसाठी आरक्षित केली आहे. ही जागा कार्तिक अमावास्येपासून मार्गशीर्ष अमावास्येपर्यंत मोकळी ठेवण्याचे आदेश आहेत. मार्गशीर्ष वद्य नवमी ते अमावास्येअखेर सात दिवस यात्रा भरते. यात्रेकरिता सरकारने आरक्षित केलेल्या जमिनीची पैसेवारीने अगर प्लाॅट पध्दतीने विक्री, अभिहस्तांतरण, देवाण - घेवाण किंवा अन्य प्रकारे विल्हेवाट लावणे. कोणतेही करार, खरेदीपत्र करण्यास मनाई आहे.
अशा प्रकारे केलेले सर्व खरेदी व्यवहार बेकायदेशीर असून, या जमिनीत कोणत्याही प्रकारचे बांधकाम करता येणार नाही. झालेली बेकायदेशीर बांधकामे काढून टाकण्याचा अधिकार ग्रामपंचायतीस आहे.
असे असतानाही काही धनदांडग्यांनी शासन आदेशाचे उल्लंघन करून आरक्षित असलेल्या जमिनीवर गुंठेवारी पध्दतीने प्लाॅट पाडून जाहिरातबाजी सुरू केली आहे. भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या यल्लमादेवी यात्रेसाठी आरक्षित असलेल्या जमिनीवर अतिक्रमणे सुरू असल्याने यापुढील काळात यात्रा भरविण्यात अडचणी येणार आहेत. जागेवरील अतिक्रमणे काढून टाकावीत, अशी मागणी भाविकांतून होत आहे.
काेट
श्री यल्लमादेवी यात्रेच्या आरक्षित जागेवर अतिक्रमणे होत राहिली तर भविष्यात यात्रा भरविताना अडचणी येणार आहेत. आरक्षित असलेल्या जमिनींवर अतिक्रमणे करणाऱ्यांवर कारवाई करावी. यासाठी आम्ही प्रतिष्ठानतर्फे जत पोलीस ठाण्यास तक्रार दिली आहे.
- श्रीमंत शार्दुलराजे डफळे.
अध्यक्ष, श्री यल्लमादेवी प्रतिष्ठान
फोटो : ०७ संख १
ओळ : जत येथील यल्लमादेवी यात्रेसाठी आरक्षित असलेल्या जमिनीवर अतिक्रमणे सुरू आहेत.