झंझावाताची अखेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 12:33 AM2018-03-10T00:33:40+5:302018-03-10T02:19:14+5:30

पतंगराव कदम म्हणजे झंझावात, पतंगराव म्हणजे अफाट कर्तृत्व, दानशूरपणाचा परिपाक आणि पतंगराव म्हणजे कामांचा धडाका... अशी नानाविध

The end of the thunderstorm | झंझावाताची अखेर

झंझावाताची अखेर

Next

- श्रीनिवास नागे

पतंगराव कदम म्हणजे झंझावात, पतंगराव म्हणजे अफाट कर्तृत्व, दानशूरपणाचा परिपाक आणि पतंगराव म्हणजे कामांचा धडाका... अशी नानाविध विशेषणं हिकमतीनं मिरविणाºया पतंगरावांचा जीवनप्रवास थक्क करणारा होता.

अवघ्या तीन वर्षांत काळजाला चटका लावून जाणाºया तीन ‘एक्झिट’ सांगलीकरांनी अनुभवल्या. पहिली आर. आर. पाटील तथा आबांची, दुसरी मदनभाऊ पाटील यांची आणि तिसरी आताची पतंगराव कदम यांची. या तिघांत बरंच साम्य होतं. तिघांनीही सांगलीचा राजकीय पट उभा-आडवा हलता ठेवला. पक्ष वेगवेगळे झाले तरी तिघांनीही हातात हात घालून राजकीय वाटचाल केली. तिघांचीही जिल्ह्याच्या राजकारणावर मांड. तिघंही काँग्रेसच्या विचारधारेतून पुढं आलेले... आणि तिघांच्या मृत्यूचं कारण, आजारपणही जिल्ह्याला अगदी शेवटच्याच टप्प्यात कळलेलं. त्यामुळंच तिघांच्या ‘एक्झिट’ चटका लावणाºया ठरल्या.

गगनाला गवसणी घालणाºया झंझावाती कामांतून आणि अफाट कर्तृत्वाच्या जोरावर पतंगरावांचा जिल्ह्यासह राज्यभरात दबदबा तयार झाला होता. काँग्रेसवरील अढळ निष्ठेमुळं दिल्लीत ‘हायकमांड’कडंही वजन होतं. पक्षाकडून काही कडवट प्रसंग पचवायला लागूनही पतंगरावांचं काँग्रेसच्या विचारधारेवरचं प्रेम कमी झालेलं नव्हतं.

सांगलीपासून मुंबईतल्या मंत्रालयापर्यंत कामांचा-प्रश्नांचा जागेवरच निपटारा, हे सूत्र त्यांनी अखेरपर्यंत सांभाळलं. अठरा वर्षे मंत्री असताना तेवढा वचक होता त्यांचा प्रशासनावर! त्यांच्या कामात ठरवून आणलेला धडाका असे. जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांच्याकडं मदत व पुनर्वसन खातं होतं. टंचाई, दुष्काळ, अतिवृष्टी अशा संकटांवेळी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक दर मंगळवारी होत असे. पतंगराव तेव्हा या समितीचे अध्यक्ष होते. या बैठकीत मंगळवारी पतंगराव ठोस निर्णय घेत असत आणि बुधवारी त्या निर्णयाप्रमाणं शासकीय परिपत्रकं-जीआर निघत असत! मंगळवारी निर्णय आणि बुधवारी लगेच जीआर!! कित्येक निर्णय त्यांनी अत्यंत धडाडीनं घेतले होते.

काँग्रेस-राष्टÑवादी आघाडी शासनाच्या काळात सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ, ताकारी, टेंभू या सिंचन योजनांचं वीज बिल थकीत असायचं. परिणामी योजना बंद राहायच्या. त्यांचं वीज बिल कुणी आणि कसं भरायचं, असा प्रश्न पुढं यायचा. पतंगरावांकडं मदत व पुनर्वसन खात्यांची जबाबदारी होती. त्यावेळी ही रक्कम राज्य सरकारद्वारे टंचाई निधीतून भरली जायची. सलग तीन वर्षांत अनुक्रमे १४ कोटी, १४ कोटी ५० लाख आणि तीन कोटी २५ लाख, असा निधी पतंगरावांनी यासाठी दिला होता.

खरं तर दिलदार राजकारणी आणि दानत असणारा मोठा माणूस ही त्यांची खरी प्रतिमा. भाषेला रोखठोकपणाचा आणि अस्सलपणाचा बाज. मिश्कीलपणा तर अंगात भिनलेलाच. पस्तीस-चाळीस वर्षे राजकारणाचा गाढा अनुभव गाठीशी असल्यानं मुरब्बीपणाही आलेला. वरवर फटकळ वाटणारा स्वभाव; पण नंतर मात्र त्यामागील ‘सीरियस’ पतंगराव दिसायचे. भारती विद्यापीठाच्या पसाºयापासून मंत्रालयातल्या लाल फितीपर्यंत सारं काही त्यांनी लीलया सांभाळलं. त्यांचा मतदारसंघ असलेल्या पलूस-कडेगावपासून राज्यभरातील लोक काम घेऊन येत. पतंगराव सांगलीत असत, तेव्हा ‘अस्मिता’ बंगल्याच्या आवारातलं हे नेहमीचं चित्र. कुणी फी माफ करण्यासाठी आलेलं, तर कुणी मंत्रालयातल्या फायलीबद्दल आलेलं. कुणाच्या मुलीला मेडिकलला अ‍ॅडमिशन हवी असायची, तर कुणाच्या पोराला नोकरी!

अभिमत विद्यापीठाचा दर्जा
पतंगराव कदम यांनी सुरू केलेल्या भारती विद्यापीठात सध्या २ लाख ५० हजार विद्यार्थी शिकत आहेत. दहा हजार प्राध्यापक आहेत. पतंगरावांनी भारती विद्यापीठ नावाचे रोपटे लावले. त्याचा वटवृक्ष झाला आहे. ज्या उत्तम व दर्जेदार संस्था आहेत, त्यांनी केंद्र सरकारकडे अभिमत विद्यापीठाच्या मंजुरीसाठी अर्ज करायचा असतो. केंद्र सरकार तो अर्ज विद्यापीठ अनुदान आयोगाकडे पाठविते. विद्यापीठ अनुदान आयोग तज्ज्ञांची समिती नेमते. परंतु, त्यावेळी पुणे विद्यापीठाचे मोठे नाव असताना, आपण अभिमत विद्यापीठ करायला नको, असे भारती विद्यापीठातील प्राध्यापकांचे मत होते. परंतु पतंगरावांनी सर्वांना समजावून सांगितले की, आपण छोट्या गोष्टी करायच्या नाहीत. मोठ्या गोष्टी करायच्या, मोठा विचार करायचा, ध्येयवादाने काम करायचे! त्यावर अभिमत विद्यापीठासाठी प्रस्ताव दिला गेला. १९९६ मध्ये १६ तज्ज्ञ लोकांची भारती विद्यापीठाच्या मान्यतेसाठी कमिटी आली. या कमिटीच्या शिफारशीने सरकारने या विद्यापीठाला अभिमत विद्यापीठाचा दर्जा दिला गेला. पतंगरावांनी संस्था नोंद करतानाच घटनेत लिहिले होते की, एक दिवस या संस्थेचे विद्यापीठ होईल. त्यावेळी पुण्यातील लोकांनी त्यांची टिंगल केली. परंतु, पतंगरावांनी या संस्थेला विद्यापीठाचा दर्जा मिळवून दिलाच.

भान आणि बेभान...
पतंगरावांच्या कामांचा धडाका विलक्षण होता. ‘भान ठेवून योजना आखायची आणि बेभान होऊन ती राबवायची’, ही त्यांची कामाची पद्धत होती. सिंचन योजनांच्या थकीत बिलांसाठी टंचाई निधीतून मदत, कुंडलची वनअकादमी, सांगलीतील जिल्हाधिकारी कार्यालयाची नवी इमारत, यशवंतराव चव्हाण यांची जन्मशताब्दी ही या कामाच्या पद्धतीची ठसठशीत उदाहरणे.

अवघे ३८ रुपये
१ जून १९६१ रोजी ३८ रुपये घेऊन टी.डी. हा शिक्षक होण्याचा कोर्स करण्यासाठी पतंगराव कदम पुण्याला गेले. वाडिया कॉलेजमध्ये हा कोर्स पूर्ण केला. टी.डी.चा निकाल लागण्यापूर्वीच १९६१ मध्ये त्यांनी साधना विद्यालय (हडपसर) येथे अर्धवेळ शिक्षकाची तीन वर्षे नोकरी केली... आणि त्या पुण्यातच त्यांनी १९६४ मध्ये भारती विद्यापीठाची स्थापना केली.

दि. २ डिसेंबरला झालेला माजी मंत्री मदनभाऊ पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरणाचा समारंभ हा पतंगरावांचा सांगलीतील शेवटचा जाहीर कार्यक्रम. तेव्हाही सर्वपक्षीय नेत्यांच्या हजेरीत त्यांनी मंचावरून तुफान फटकेबाजी केली. त्याआधीच्या आठवड्यात त्यांनी कवठेएकंदला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतला कार्यक्रम हास्यविनोदांनी आणि इरसाल किश्श्यांनी गाजविला होता. भाषणात कुणाचीही भीडभाड न ठेवता दिग्गजांच्या टोप्या उडविण्यात त्यांचा हातखंडा होता.

वक्तृत्वाची अमोघ देणगी लाभलेले माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील भाषणात पतंगरावांचा उल्लेख ‘मोठे बंधू’ असा करीत. दोघांत अलिखित ‘अंडरस्टँडिंग’ होतं. अर्थात दोघेजण कार्यक्रमात एकत्र असले तर जुगलबंदी हमखास रंगत असे. आर. आर. आबांच्या निधनानंतर आठवणी निघाल्यानंतर पतंगराव हळवे होत...

कडेगाव, पलूसच्या विकासाचे शिल्पकार
पूर्वीच्या खानापूर तालुक्यातील ४२ गावे आणि तासगाव तालुक्यातील १३ गावे अशी ५५ गावे मिळून कडेगाव तालुक्याची स्थापना पतंगराव कदम यांच्या प्रयत्नाने झाली. २ जुलै १९९९ रोजी ३४ गावांची मिळून पलूस तालुक्याची निर्मिती झाली, तर ६ एप्रिल २००२ रोजी कडेगाव तालुका अस्तित्वात आला.
तालुक्याच्या निर्मितीनंतर कदम यांनी कडेगाव येथे तहसील कार्यालय तसेच तालुक्यातील सर्व विभागांच्या कार्यालयांसाठी भव्य प्रशासकीय इमारत उभारली. कडेगाव व चिंचणी-वांगी पोलीस ठाण्याची इमारत साकारली. कडेगाव व चिंचणी-वांगी ग्रामीण रुग्णालय मंजूर करून आणले आणि सुसज्ज इमारतीत शासनाच्या आरोग्य विभागामार्फत रुग्णसेवा सुरू केली.
कडेगाव-पलूस तालुक्यांसाठी कडेगावला स्वतंत्र प्रांताधिकारी कार्यालय सुरू केले. वनमंत्री असताना वन विभागाचे स्वतंत्र कार्यालय कडेगावला आणले. दुष्काळी भागास वरदान ठरणाºया ताकारी व टेंभू उपसा सिंचन योजनांच्या पूर्णत्वासाठी कदम यांचे बहुमोल योगदान आहे. तालुक्यातील २५ गावांच्या ९४५५ हेक्टर शेतजमिनीला ताकारी योजनेचे, तर ३१ गावांच्या ९३२५ हेक्टर शेतजमिनीला टेंभू योजनेचे पाणी दिले. कदम यांनी शासनाच्या माध्यमातून कोट्यवधींची विकासकामे केली. कडेगाव तालुका विकासाचे रोल मॉडेल म्हणून नावारूपास आणला. कदम यांच्या प्रयत्नांतून तालुक्यात गावोगावी ग्रामसचिवालयाच्या इमारती साकारल्या. तालुक्यातील विजापूर-गुहागर मार्गावर कडेगाव हद्दीत चौपदरीकरण केले.

कडेगाव ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा आणि पलूस ग्रामपंचायतीला नगरपालिकेचा दर्जा मिळवून देण्यात कदम यांचे बहुमोल योगदान आहे. कदम यांनी सोनहिरा कारखाना, सागरेश्वर सूतगिरणी, कृष्णा-वेरळा सूतगिरणी, वाईन पार्क, भारती विद्यापीठाची शाळा, महाविद्यालये पलूस व कडेगाव तालुक्यात सुरू केले.
पंचायत समिती, पलूस पोलीस ठाणे, तहसील कार्यालय, न्यायालय, प्रशासकीय इमारत यासह सर्व शासकीय कार्यालये एका आवारात आणल्याने नागरिकांना एकाच ठिकाणी सगळ्या सुविधा उपलब्ध झाल्या.
सांडगेवाडीत एमआयडीसीच्या माध्यमातून वाइन पार्कची उभारणी केली. या माध्यमातून अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. औदुंबर हे तीर्थक्षेत्र नावारूपास आणले. त्याचबरोबर आमणापूर, सुखवाडी, पुणदी येथे कृष्णा नदीवर पूल बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला

Web Title: The end of the thunderstorm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.