इस्लामपूर : सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्याच्या प्रबोधनाबरोबरच, कायद्याची कडक अंमलबजावणी होणेही अत्यंत गरजेचे आहे. मुलींची कौमार्य चाचणी आपल्या देशात काही समूहात होते, ही लाजीरवाणी बाब आहे. अशा अघोरी प्रथांचे उच्चाटन झाले पाहिजे, असे मत महाराष्ट्र अंनिसच्या बुवाबाजी विरोधी विभागाच्या राज्य कार्यवाह अॅड. रंजना गवांदे (संगमनेर) यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा महिला विभाग आणि सोशल मीडिया व्यवस्थापन विभागाच्यावतीने, ‘गुंफू हातांमध्ये हात, फुलू सारे एक साथ’ या मुख्य विषयांतर्गत,‘कसा गं बाई जातीचा ह्यो किला’, म्हणजेच जातपंचांचा मनमानी कारभार या विषयावर ॲड्. रंजना गवांदे बोलत होत्या. त्या म्हणाल्या, स्त्रीपासून मूल जन्माला येते. स्त्री ही पुनरुत्पादन करते, असा समज होता. पुरुषांच्या सहभागाचे ज्ञान नव्हते, तोपर्यंत स्त्रीकडे आदराने पाहिले जात होते; पण जेव्हा स्त्रीला अपत्य होण्यामागे पुरुषांचाही सहभाग असतो, हे समजले, तेव्हापासून स्त्रीला गौणत्व प्राप्त झाले. तिला दुय्यमत्वाची वागणूक मिळू लागली. तिच्या निसर्गसुलभ अशा मासिक पाळीला अपवित्र समजले गेले. खरं तर पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा भाग असलेली मासिकपाळी अपवित्र कशी? विटाळा, अमंगलता, अपवित्रता अशा अशास्त्रीय कल्पना तिच्या माथी मारल्या गेल्या.
अॅड. रंजना गवांदे म्हणाल्या, जात पंचायतीच्या मनमानी कारभाराला चाप लावण्याचे काम समितीने केले आहे. जातीच्या धार्मिक कार्यक्रमांच्या प्रथा, रूढी, चालीरितीचा, धार्मिक जाणिवांचा ताबा त्यांनी घेतला. त्यातून त्या जाती, पोटजातींमधील समाजबांधवांवर मोठी दहशत कायम कशी राहील, त्यासाठी स्वत:च्या मनाला येईल तसे मनमानी न्यायनिवाडे, बंधने, बहिष्कार त्यांच्यावर घातले जात आहेत. जातीपातीची ही मगरमिठी कधीच सैल होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेण्यात आली. त्यासाठी ते कधी व्यक्तिगत, तर कधी पती-पत्नी, बाप-मुलगा, मुलगी, तर कधीकधी सर्व कुटुंबालाच वाळीत टाकले जाते. बहिष्कृत करणे असे मानवतेला काळिमा ठरणारे, अन्यायकारक न्यायनिवाडे ते करू लागले.