इस्लामपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाने नवीन शैक्षणिक धोरणाशी सुसंगत निर्णय घेत पहिल्यांदाच विद्यार्थ्यासाठी दोन विविध शाखांतून एकाच वेळी पदवीची अर्थात ‘ड्युएल डिग्री’ ही संकल्पना आणण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचा देशभरातील नामांकित विद्यापीठांमध्ये समावेश आहे.
मजबूत शिक्षणप्रणाली हे या विद्यापीठाचे वैशिष्ट्य असून, अत्यंत जलद व त्रुटीमुक्त निकाल जाहीर करण्याची विशेष पद्धती या विद्यापीठाने सिद्ध केली आहे. ऑटोनॉमस पॅटर्नच्या धर्तीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ‘रेमिडियल’ परीक्षांचा पॅटर्न फायदेशीर ठरत आहे. विद्यार्थ्याच्या कौशल्याला विशेष व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या संशोधनात्मक वृत्तीला चालना मिळावी, या उद्देशाने महाविद्यालयामध्ये ‘रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेल’ कार्यरत असून, विद्यापीठस्तरावरही विविध शिष्यवृत्तीच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले जाणार आहे.
आत्मनिर्भर भारत या अंतर्गत दुरदृष्टीतून तरुण संशोधक व उद्योजकांच्या कल्पनांना वाव मिळावा, यासाठी स्वतंत्र विभाग या विद्यापीठांतर्गत कार्यरत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठांतर्गत विद्यार्थ्यासाठी प्रत्येक वर्षी ‘इंडस्ट्रियल ट्रेनिंग’ची उपलब्धता करून देण्यात आली आहे. वास्तविक जीवनातील औद्योगिक समस्येवर प्रत्यक्षरीत्या कार्य करण्याची संधी या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळणार आहे. विद्यापीठाने एन.पी.टी.ई.एल. स्वयम यांसारख्या प्लॅटफॉर्मवरून ऑनलाइन पद्धतीने विषयांची निवड करण्याची लवचिकता दिली असून, विद्यार्थ्यांना आय.आय.टी., एन.आय.टी. या जागतिक दर्जाच्या संस्थांकडून हे विषय शिकण्याची संधी मिळते.
विद्यार्थ्यांचे सॉपट स्किल वाढविण्यासाठी प्रथम सत्रापासून विशेष भर देण्यात आला आहे. अशा नवीन शैक्षणिक धोरणाशी सुसंगत असणाऱ्या विद्यापीठाशी ज्या महाविद्यालयांची संलग्नता आहे. अशा सर्व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना या नवीन शैक्षणिक सुविधांचा लाभ घेता येणार आहे.
चौकट
नानासाहेब महाडिक अभियांत्रिकी महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक प्रा. महेश जोशी म्हणाले, प्रथम आणि थेट द्वितीय वर्ष इंजिनिअरिंगच्या बी.टेक अभ्यासक्रमासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘ड्यूएल डिग्री’ या संकल्पनेमुळे नोकरीच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार असून, ‘मल्टिस्किल’ मनुष्यबळ निर्मितीसाठी याचा फायदा होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना करिअरसाठी त्यांच्या आवडीचे क्षेत्र मिळणार आहे.