अशोक डोंबाळे / सांगली, लोकमत न्यूज नेटवर्क: राज्यात ३१ जुलै २०२२ रोजी झालेल्या पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत आठवीच्या उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचा पेपर इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचा दिला आहे. यामुळे उर्दू माध्यमांच्या मुलांचे मोठे शैक्षणिक नुकसान होणार आहे. म्हणून शिक्षण आयुक्तांनी आठवीच्या उर्दू माध्यमांच्या मुलांची फेरपरीक्षा घ्यावी, अशी मागणी शिक्षक संघटना आणि पालकांनी केली आहे.
रविवारी, ३१ जुलैला राज्यात शिष्यवृत्तीपरीक्षा झाली. आठवीच्या उर्दू माध्यमाच्या मुलांना बुद्धिमत्ता व इंग्रजी विषयाचा दुसरा पेपर दिला होता. यामध्ये फार मोठी चूक झाली आहे. उर्दू व मराठी माध्यमाच्या मुलांना तृतीय भाषा इंग्रजी हा विषय असतो, मराठी माध्यमाच्या मुलांचा इंग्रजी विषयाचा पेपर बरोबर होता; मात्र उर्दू माध्यमाच्या मुलांना बुद्धिमत्ता व इंग्रजी पेपरमध्ये इंग्रजी विषयाचे जे प्रश्न विचारले आहेत ते इंग्रजी माध्यमाच्या प्रथम भाषेचे आहेत. वास्तविक पाहता मराठी माध्यमाचा पेपर आहे, तोच पेपर उर्दू माध्यमाच्या मुलांना देण अपेक्षित होते. तृतीय भाषा इंग्रजीचा पेपर देण्याऐवजी प्रथम भाषा इंग्रजी माध्यमाचा पेपर दिला आहे. यामुळे मुलांना इंग्रजीचा पेपरच सोडविता आला नाही. या प्रकारामुळे मुले संपूर्णपणे गोंधळलेली दिसून आली.
चुकीचा पेपर दिल्यामुळे उर्दू माध्यमाची मुले पेपर सोडवूच शकली नाहीत. राज्यात सर्वत्र असाच प्रकार झाला असून, याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे. तसेच उर्दू माध्यमाच्या आठवीच्या मुलांचा दोन नंबरचा पेपर पुन्हा घेण्याची गरज आहे. नाही तर जे इंग्रजी विषयाचे गुण आहेत ते संपूर्ण गुण मुलांना देण्याची गरज आहे. अन्यथा उर्दू माध्यमांच्या पालकांना मुलांच्या हितासाठी राज्यभर आंदोलन करावे लागेल, असा इशारा पालकांनी दिला आहे.
मुलांना शंभर टक्के गुण द्या : मुश्ताक पटेल
शिष्यवृत्ती परीक्षेत उर्दू माध्यम आठवीच्या दोन नंबरचा पेपर इंग्रजी माध्यमाच्या मुलांचा दिला आहे. ही गंभीर चूक शिक्षण विभागाकडून राज्यात सर्वत्र झाली आहे. एक तर शिक्षण विभागाने फेरपरीक्षा घ्यावी, नाही तर मुलांना इंग्रजी पेपरला १०० टक्के गुण द्यावेत, अशी मागणी शिक्षक भारत उर्दू संघटनेचे राज्याध्यक्ष मुश्ताक पटेल यांनी केली आहे.