अविनाश कोळी, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली : उन्हाच्या तीव्रतेमुळे मतदानावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात असतानाच मंगळवारी मतदानादिवशी अनेक मतदान केंद्रांवर भर उन्हात मतदारांच्या रांगा लागल्याचे तसेच उन्हाची तीव्रता असतानाही मतदानाला लोक जातानाचे चित्र दिसून आले.
सांगली जिल्ह्याच्या विविध भागांत मतदानाचा उत्साह दिसून आला. सकाळपासून मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. दुपारनंतर काही ठिकाणी मतदान केंद्र ओस पडली असली तरी बऱ्याच गावांमध्ये व शहरात भर उन्हातही नागरिक मतदानासाठी बाहेर पडताना दिसून आले. उन्हाच्या तीव्र झळा असतानाही मतदानाचा उत्साह दिसून आला. शाळांच्या वऱ्हांड्यात सावली असल्याने त्याठिकाणी रांगेत थांबणे मतदारांना सोयीचे हाेते. काही शाळांमध्ये लांब रांगा असल्यामुळे उन्हामध्ये थांबावे लागले. तरीही मतदानाचा हक्क बजावण्यात आला.
मंडपात थाटले बुथ
उन्हाची तीव्रता अधिक असल्यामुळे सांगली, मिरज शहरासह ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी मंडपात पक्षीय बुथ उभारले होते. काहींनी मोठ्या छत्र्या लावून बुथवर काम केले. उन्हाच्या तीव्रतेचा अंदाज घेऊन अनेकांनी इमारतीच्या छताखाली, झाडाच्या सावलीत बुथ उभारले होते.
पारा चाळिशी पार
सांगलीचा पारा मंगळवारी मतदानाच्या दिवशी चाळिशी पार गेला. मागील दोन दिवसांच्या तुलनेत अंशाने घट नोंदली गेली. तरीही दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत उन्हाची तीव्रता कायम होती.
पोलिसांनाही उन्हाच्या झळा असह्य
उन्हाच्या तीव्र झळांचा सामना मतदान केंद्रावर बंदोबस्तावर असलेल्या पोलिस व होमगार्डच्या जवानांना करावा लागला. काही पोलिसांनी झाडाखाली आसरा घेतला, तर केंद्रामध्ये नियुक्त पोलिसांना सावली लाभली. बाहेरील बंदोबस्तात असलेल्या पोलिसांचे हाल झाले .
घामाने भिजले अंग, तरीही मतदानात दंग
अनेक शाळांमध्ये पंखे नव्हते. वऱ्हांड्यातही फारसा गारवा नव्हता. त्यामुळे मतदान केंद्रांवरील कर्मचाऱ्यांसह रांगेत थांबलेले मतदार घामाने भिजले होते. तरीही मतदानाचा हक्क त्यांनी बजावला.
कार, रिक्षातून केंद्रापर्यंत प्रवास
उन्हापासून बचाव म्हणून अनेक मतदार चारचाकी, तीनचाकी वाहनातून मतदान केंद्रापर्यंत आले होते. उन्हात चालत येणे मतदारांनी टाळले. छाेट्या गावांमध्येही हे चित्र दिसून आले.