लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : महापालिका क्षेत्रातील उद्योजकांकडे २१ कोटी रुपयांचा एलबीटी थकीत आहे. यासंदर्भात सोमवारी महापालिकेत उद्योजक व पदाधिकाºयांची बैठक झाली; पण बैठकीत उद्योजकांनी भरलेला कर व पालिकेकडे जमा असलेला कर यात तफावत आढळून आल्याने थकबाकीचा आकडा निश्चित झाल्यानंतर पुन्हा बैठक घेऊन चर्चा करण्यात येणार आहे.
महापालिका क्षेत्रात तीन औद्योगिक वसाहती आहेत. तेथील उद्योजकांनी एक टक्क्याप्रमाणे एलबीटी कर भरलेला आहे. वास्तविक एलबीटी कायद्याने उद्योजकांना तीन ते पाच टक्के कर होता; पण मदनभाऊ पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर एक टक्का कर भरण्याचा तोडगा झाला होता. त्यानुसार उद्योजकांनी कर भरून उर्वरित करमाफीसाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता, पण त्याचा अद्याप निर्णय लागलेला नाही.त्यात महापालिकेने उर्वरित एलबीटीपोटी उद्योजकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यासंदर्भात सोमवारी महापालिकेत उद्योजक, पदाधिकारी व अधिकाºयांची बैठक झाली.
या बैठकीला महापौर हारुण शिकलगार, उपमहापौर विजय घाडगे, विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते, नगरसेवक शेखर माने, शिवराज बोळाज, उद्योजक संजय अराणके, सचिन पाटील, विनोद पाटील, एलबीटी अधीक्षक अमर छाचवाले उपस्थित होते.उद्योजकांची साडेपाच कोटींची मूळ थकबाकी आहे. त्यावरील दंड व व्याजाची रक्कम १६ कोटींच्या घरात आहेत. उद्योजकांनी एलबीटीत करमाफीची मागणी केली असून, हा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहेत. त्यात शासनाने करपात्र सर्वांचे असेसमेंट करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे उद्योजकांचेही असेसमेंट करावे लागेल, असे अधीक्षक छाचवाले यांनी स्पष्ट केले.
उद्योजकांनी भरलेला एलबीटी आणि महापालिकेकडे जमा असलेला कर यात तफावत आढळून आली. त्यामुळे महापौरांनी या तफावतीची तपासणी करून त्याचा अहवाल गुरुवारपर्यंत सादर करण्याचे निर्देश एलबीटी विभागाला दिले. एलबीटीतील आकड्यांचा घोळ संपल्यानंतर पुन्हा बैठक घेऊन चर्चा करण्याचे आश्वासनही महापौरांनी यावेळी दिले.दुसरे खाते, की वेगळे पावती पुस्तक ?एलबीटीतील जमा रकमेत तफावत आढळून आली. उद्योजकांचा एलबीटी भरणा करण्यासाठी महापालिकेने बँकेत वेगळे खाते काढले आहे का? की वेगळे पावती पुस्तक तयार करण्यात आले?, याचाही शोध घ्या, असा टोला नगरसेवक शेखर माने यांनी बैठकीत लगावला.