अशोक पाटीलइस्लामपूर : इस्लामपूर-शिराळा मतदारसंघ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा बालेकिल्ला आहे. भाजपमधील दिग्गज नेत्यांनी किल्ला नेस्तनाबूत करण्यासाठी फिल्डिंग लावली आहे. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या दोन्ही मतदारसंघावर लक्ष्य केंद्रीत केले असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केंद्र सरकारच्या विविध योजना घराघरात पोहोचविण्याच्या माध्यमातून जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यात शिरकाव करण्याची तयारी केली आहे.तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इस्लामपूर-शिराळा मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात भाजपची फळी भक्कम करण्याची तयारी केली. तत्कालीन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही इस्लामपूर-शिराळा मतदारसंघातील दिग्गज नेत्यांना पदांचे आमिष दाखवून भाजपमध्ये प्रवेश दिले, तर काहींना महामंडळे देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु राज्यात आघाडी सरकार आल्याने इस्लामपूर-शिराळा मतदारसंघातील भाजपची हवा पुन्हा विरली.इस्लामपूर-शिराळा मतदारसंघात शिवसेनेच्या फुटीचा कोणताही परिणाम झाला नाही. मात्र राष्ट्रवादीच्या फुटीनंतर जयंत पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवारच उभे ठाकले. आगामी राजकारणात राहुल आणि सम्राट महाडिक यांना ताकद देण्याचा शब्द दिला. महाडिक परिवाराला अनेक दिग्गज नेत्यांनी शब्द दिले परंतु ते पाळले गेले नाहीत, याची खंत महाडिक समर्थकांत आहे.इस्लामपूर-शिराळा मतदारसंघात भाजपची ताकद वाढवण्यासाठी स्वत: प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची एन्ट्री राष्ट्रवादी विरोधात यशस्वी होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तत्कालीन युती शासनाच्या कारकीर्दीत जयंत पाटील विरोधी गटाला भाजपसोबत ताकद देण्याचा वेळोवेळी प्रयत्न झाला आहे. परंतु ऐनवेळी भाजपमधील अंतर्गत संघर्ष राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडला आहे. आता स्वत: भाजपचे प्रदेशाध्यक्ष इस्लामपूर-शिराळा मतदारसंघात जयंत पाटील विरोधी मोट बांधणार का? हा मुद्दा औत्सुक्याचा आहे.
विराेधकांची ताकद नेहमीच ताेकडीराष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भाजपमधील दिग्गज नेत्यांशी जवळीक असल्याचे नेहमीच बोलले जाते. परिणामी इस्लामपूर-शिराळा मतदारसंघातील भाजपमधील दिग्गज नेत्यांना ताकद देऊनही जयंत पाटील यांच्याविरोधात तोकडी पडते.