म्हैसाळ : सांगलीच्या बिबट्यापाठोपाठ आता म्हैसाळमध्ये जंगली गवा रेड्याने एन्ट्री केल्याने एकच खळबळ उडाली.मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ढवळी रस्ता या भागातील शेतात जंगली गवा रेडा दिसल्याने शेतकऱ्यांच्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत सकाळी म्हैसाळ ग्रामपंचायत सदस्य पुष्पराज शिदे -म्हैसाळकर हे ढवळी रस्ताकडे गेले असता.त्यांना गवा रेडा दिसला.त्यानंतर त्यांनी वनविभाकडे यांची माहिती दिली.सकाळी दहा वाजता हा जंगली गवा ढवळी कडून कुटवाड रस्ता,कनवाड रस्ता,स्मशानभूमी रस्ता,कागवाड रस्ता,कनकेश्वर रस्ता या भागातील शेतात फिरत होता. या वेळी गावात गवा रेडा शिरल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली.
गवा पाहण्यासाठी नागरिक गवाच्या पाठीमागून शेता-शेतातून पळत होते. शेतात काम करणारे मजूर, महिला,यांच्यात घबराटीचे वातावरण तयार झाले आहे. गवा रेडा पाहण्यासाठी युवा वर्गाची मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती.दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान गवा कागवाडच्या दिशेने गेला.दुपारी एक वाजता वनविभागाचे अधिकारी गावात हजर झाले. त्यावेळी गवाने कर्नाटक राज्यात प्रवेश केला होता.