विटा : स्वच्छ सर्वेक्षण २०२१ आणि माझी वसुंधरा अभियानांतर्गत विटा शहरात नगरपरिषदेच्यावतीने आयोजित केलेल्या पर्यावरणपूरक स्वच्छता रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या रॅलीमध्ये प्लास्टिक बंदी, कचरामुक्त शहर, पर्यावरण संवर्धन अशा विविध विषयांच्या घोषणा देऊन जनजागृती करण्यात आली. रॅलीत नगराध्यक्षा प्रतिभा पाटील, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, मुख्याधिकारी अतुल पाटील यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले होते.
यावेळी मुख्याधिकारी अतुल पाटील यांनी, माझी वसुंधरा अभियानांतर्गत आपले शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, तसेच वायु, अग्नि, जल, पृथ्वी आणि आकाश या पंचतत्त्वांच्या माध्यमातून आपण आपले पर्यावरण स्वच्छ ठेवण्यासाठी मदत करावी आणि स्वच्छ सर्वेक्षणमध्ये विटा शहर देशात अव्वल येण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन केले.
रॅलीची सुरूवात नगरपरिषदेच्या खुले नाट्यगृहापासून झाली. यावेळी वसुंधरा व स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. त्यानंतर विविध जनजागृतीच्या घोषणा देत ही रॅली शहरातील सर्व प्रभागातून काढण्यात आली. यावेळी आरोग्य निरीक्षक आनंदा सावंत, अभियानाचे प्रमुख योगेश साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग किंगरे, अधीक्षक बाजीराव जाधव यांच्यासह बळवंत महाविद्यालय, विटा हायस्कूलच्या एनसीसी विभागाचे विद्यार्थी, अधिकारी, पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
फोटो : ३०१२२०२०-विटा-नगरपालीका ०१ किंवा ०२ :
ओळ :
विटा नगरपरिषदेच्यावतीने शहरात बुधवारी पर्यावरणपूरक स्वच्छता रॅली काढण्यात आली. यावेळी अधिकाऱ्यांसह विद्यार्थीही या रॅलीत सहभागी झाले होते.