लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : शिराळा पर्यावरण समृद्धी मंच या समूहाने ‘पर्यावरणतज्ज्ञ आपल्या भेटीला’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या तज्ज्ञ व्यक्तींना वेबिनारच्या माध्यमातून आमंत्रित करण्यात येत आहे. पर्यावरणाविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
पर्यावरण समृद्धी मंचने या माध्यमातून शिराळा तालुक्यातील नैसर्गिक वारसा जपण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
जागतिक मातृदिन आणि कर्मवीर भाऊराव पाटील पुण्यतिथी याचे औचित्य साधून या उपक्रमातील पहिले व्याख्यान ऑनलाइन घेण्यात आले. या उपक्रमांतर्गत बीड येथील पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे प्रा. मोहन परजणे यांनी ‘आजच्या समाजव्यवस्थेची दिशा : पर्यावरण समृद्धी की पर्यावरण विध्वंस’ याविषयी मार्गदर्शन केले. गटशिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर, जलनायक प्रकाश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. परजने म्हणाले, पर्यावरण क्षेत्रात अनेक संस्था-संघटना कार्यरत आहेत, तरीही स्थानिक पातळीवर संघटनात्मक भरीव काम होण्याची आवश्यकता आहे. आजच्या तरुणाईत पर्यावरण दृष्टिकोन विकसित करण्याची आवश्यकता आहे. पुढच्या पिढीला आनंदी जगण्यासाठी आत्ताच प्रयत्न केले, तर पुढील धोका टळू शकेल. जागतिक पर्यावरण चळवळीचा गावपातळीवर कृती कार्यक्रम गरजेच आहे. आपण पर्यावरणाचा असाच नाश करत राहिलो तर पर्यावरण दिवाळखोरीला सामोरे जाण्याची तयारी केली पाहिजे.
पाणीटंचाई कमी करण्यासाठी गावोगावी पाणलोट क्षेत्र विकासाची कामे झाली पाहिजेत. शेतकऱ्यांनी स्थानिक प्रजातीच्या बियाणांना प्राधान्याने द्यावे. आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या जमिनीतील सुपीकता टिकून राहण्यासाठी पूरक पीक पीकपद्धतीचा आग्रह धरावा.
चर्चासत्रात प्रा. स्वाती जांभळी, सुप्रिया घोरपडे, करुणा मोहिते, चंद्रकांत पाटील, महादेव हवलदार, संभाजी पाटील, सुहास माळी, दीपक भुसारी, राहुल बामणे, अरविंद देसाई, ए. आर. जगदाळे, मोहन पाटील, जितेंद्र लोकरे आदी सहभागी झाले होते.