विकास शहा
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : एखाद्या व्यक्तीने कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्यांची रक्षा पाण्यामध्ये विसर्जित केली जाते. मात्र भटवाडी (ता. शिराळा) येथे सर्वच ग्रामस्थ घरातील व्यक्तीचे निधन झाल्यानंतर रक्षा झाडांना देतात. त्यासाठी गेल्या दीड वर्षांपासून येथील स्मशानभूमीच्या परिसरात खडकाळ माळरानावर विविध प्रकारची झाडे लावली आहेत. रक्षाविसर्जनाची राख ओढ्यात, शेतात अथवा नदीत न सोडता ती प्रत्येक झाडाला घातली जाते. गेल्या काही दिवसांमध्ये या परिसरात पक्षांचा किलबिलाट वाढला आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक रक्षाविसर्जनासह पक्षी संवर्धन चळवळीलाही बळ मिळत आहे.
शिराळा औद्योगिक वसाहतीनजीक असणारे भटवाडी हे एक लहानसे, पण कर्तृत्वाने मोठे असणारे गाव. युवा सरपंच विजय महाडिक यांनी लोकसहभागातून गावात अनेक उपक्रम राबविले आहेत.
‘चिमणी-पाखरांनो या... चारा खा, पाणी प्या. निवांत झाडावर बसून जीवन गाणे गा. अन् भुर्रर्र उडून जा’ असा अभिनव आणि पर्यावरणपूरक उपक्रम येथील ग्रामस्थांनी हाती घेतला आहे.
गेल्या दीड वर्षांपासून येथील स्मशानभूमीच्या परिसरात खडकाळ माळरानावर विविध प्रकारची झाडे लावली आहेत. रक्षाविसर्जनाची राख ओढ्यात, शेतात अथवा नदीत न सोडता ती प्रत्येक झाडाला घातली जाते. झाडांना पाणी घालण्यासाठी स्वतंत्र छोटी पाईपलाईन केली आहे. दररोज पाणी घालण्यासाठी एका व्यक्तीची नेमणूक केली आहे. कडक उन्हामुळे झाडांना पाणी कमी पडू नये, म्हणून बुंध्याला मडकी ठेवली आहेत. त्यात दररोज पाणी सोडले जाते. झाडांची चांगल्या प्रकारे वाढ झाल्याने त्या ठिकाणी पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला आहे. येणाऱ्या पक्षांना चारा पाणी मिळावे, यासाठी येथे दररोज धान्य टाकले जाते. त्यांना पाणी मिळावे, म्हणून मडकी व अंघोळ करण्यासाठी मोठा पाण्याने भरलेला डबाही ठेवला आहे.
रक्षाविसर्जन विधीसह, प्रत्येक सणाला व वर्षश्रद्धाला नैवैद्य ठेवला जातो. त्यामुळे पक्षांना मुबलक खायला मिळते. इतर वेळी त्यांच्या खाण्याची कुचंबणा होऊ नये, म्हणून तांदूळ, ज्वारी, गहू असे धान्य त्या ठिकाणी ठेवले जाते. त्यामुळे या परिसरातील पक्ष्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.
परंपरेला पर्यावरण संवर्धनाची जोड दिल्याने भटवाडी गावात एक आदर्शवत काम उभे राहत आहे.