जत : जत येथील शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अखेर शुक्रवारी पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते लाेकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील उपस्थित होते.जत येथील शिवाजी पेठेतील शिवाजी महाराजांचा पुतळा गेल्या अनेक महिन्यांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत हाेता. मुख्यमंत्र्यांसह राज्यपातळीवरील नेतेमंडळींना निमंत्रित करून लाेकार्पण करण्याचा पुतळा समितीचा प्रयत्न हाेता. मात्र नेतेमंडळींची वेळ मिळत नसल्याने अखेर कोणी येवो अगर न येवो आम्ही लोकार्पण सोहळा करणारच, असा संकल्प पुतळा समितीचे अध्यक्ष व माजी आमदार विलासराव जगताप यांनी केला होता.
त्यानुसार शुक्रवारी पालकमंत्री सुरेश खाडे व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण सोहळा झाला. यावेळी खासदार संजय पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी मंत्री अजितराव घोरपडे, आमदार विक्रम सावंत, जत राजघराण्याच्या ज्योत्स्नाराजे डफळे, शिवसेनेचे संपर्कप्रमुख योगेश जानकर, रिपाइंचे संजय कांबळे, तमनगौडा रवी-पाटील, डॉ. रवींद्र आरळी, राष्ट्रवादीचे सुरेश शिंदे उपस्थित होते.प्रास्ताविक माजी आमदार विलासराव जगताप यांनी केले. ते म्हणाले, पुतळा बसवण्यासाठी आम्हाला अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. लोकार्पण सोहळ्याची माझी जबाबदारी होती. ती पूर्ण झाल्याचा आनंद आहे.पालकमंत्री सुरेश खाडे म्हणाले, माझा पहिला मतदारसंघ जत आहे. त्यामुळे जत तालुक्याला जास्तीत जास्त निधी देण्यासाठी प्रयत्न आहे. टेंभू म्हैसाळ योजना सौर ऊर्जेवर राबविण्यास शासनाची परवानगी मिळाली आहे. यासाठी निधीचीही तरतूद केली आहे.जयंत पाटील म्हणाले, लवादामुळे कृष्णा आणि कोयनेचे पाणी जत तालुक्यासाठी उपलब्ध हाेत नव्हते. त्यामुळे वारणा खोऱ्यातून जतसाठी सहा टीएमसी पाणी उपलब्ध करून दिले आहे. दोन-तीन वर्षात या योजनेमुळे जत तालुका सुजलाम सुफलाम होणार आहे.पालकमंत्र्यांकडून माजी पालकमंत्र्यांचे कौतुकपालकमंत्री खाडे म्हणाले, मी ज्यावेळी जत मतदारसंघाचा आमदार होतो, त्यावेळी जयंत पाटील यांनी तालुक्यातील १६ ते १७ साठवण तलावांच्या कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला होता. आता त्यांनीच सहा टीएमसी पाण्याची तरतूद केल्याने या योजनेला मंजुरी मिळाली आहे.