सांगली : जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असली तरी, स्थिती नियंत्रणात आहे. त्याबरोबरच कोरोना रुग्णांवरील उपचार व उपाययोजनांबाबत प्रशासनाने केलेले नियोजन कौतुकास्पद आहे. या महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याची शक्यता गृहीत धरून त्यादृष्टीने आवश्यक ती सर्व यंत्रणा अधिक सज्ज ठेवण्यात यावी, असे निर्देश सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी रविवारी सांगलीत दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांची प्रमुख उपस्थिती होती.
कदम म्हणाले, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या शंभरावर गेली असल्याने आता अधिक सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. या महिन्यात रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता असल्याने यंत्रणेने योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यात अधिक नियोजन करत कोरोनाबाधितांवरील उपचार, उपचार करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आवश्यक सेवा-सुविधा देण्यात याव्यात.
परराज्यातील कामगार, मजूर लॉकडाऊनमध्ये त्यांच्या मूळ गावी गेल्यामुळे उद्योजकांना त्या दृष्टीने निर्माण झालेली अडचण कशा पध्दतीने सोडविता येईल, यासाठी बैठक घ्यावी. त्यासाठी उद्योजकांशी चर्चा करून प्रशासनाने निर्णय घेण्याच्या सूचनाही राज्यमंत्री डॉ. कदम यांनी दिल्या.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.राज्यमंत्री डॉ. कदम म्हणाले, यंदाच्या खरीप हंगाम शेतकºयांना दिलासादायक जाण्यासाठी पीक कर्जाचे उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे. शेतकºयांना खरिपासाठी खते, बी-बियाणे व कीटकनाशके पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतील, याकडे प्रशासनाने लक्ष दिल्यास शेतकºयांच्या अडचणी कमी होणार आहेत. शेतक-यांना त्यांच्या बांधावर बी-बियाणे व कीटकनाशके पोहोच करण्यासाठीचे नियोजन करावे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये टोळधाडीचे संकट आले असून, या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या कृषी यंत्रणेने अलर्ट रहावे व नियंत्रणासाठी आराखडा तयार करावा.