अविनाश कोळी, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली : साहित्य हे अभिजनांपुरते सीमित आहे की काय, असे वाटत असतानाच संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसाहित्याच्या वाटेने जाणाऱ्या माझ्यासारख्या महिलेची निवड झाली. लोकसंस्कृतीवरचा अडाणीपणाचा शिक्का या माध्यमातून पुसला गेला, याचा आनंद वाटतो, अशी भावना लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांनी व्यक्त केली.
त्या म्हणाल्या, आदिमावस्थेपासून आधुनिक काळापर्यंतचा मानवी जीवनाचा प्रवास लोकपरंपरेतच प्रतिबिंबित झाला आहे. मराठी साहित्य संमेलनाने माझ्या निवडीतून जात्यावर दळण दळणाऱ्या भगिनी ते विविध लोककलावंतांचा सन्मान केला आहे. जन्मभूमी पुणे व कर्मभूमी सांगलीचे माझ्या जडणघडणीत योगदान आहे. नाशिकमध्ये अभ्यासाची रुजवण झाली.
कुसुमाग्रजांसारखे पाठराखण करणारे दिग्गज साहित्यिक लाभले. सांगलीत विष्णुदास भावेंच्या नाटकांचा अभ्यास करताना कर्नाटक व त्यानंतर कोकण, गोवा, तामिळनाडू असा प्रवास सांगताना त्या म्हणाल्या, 'हम चलते रहे, और कारवाँ बनता गया...'
सहाव्या महिला अध्यक्ष
दिल्लीतील ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसंस्कृती, संत साहित्याच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांची निवड झाली. त्या संमेलनाच्या सहाव्या महिला अध्यक्ष ठरल्या. याआधी, कुसुमावती देशपांडे (ग्वाल्हेर, १९६१), दुर्गा भागवत (कन्हाड, १९७५), शांता शेळके (आळंदी, १९९६), विजया राजाध्यक्ष (इंदूर, २००१) व अरुणा ढेरे (यवतमाळ, २०१९) यांना हा मान मिळाला आहे.
अगदीच तिन्हीसांजेला नको
आयुष्याच्या सायंकाळी हा सन्मान मिळला असे वाटते का, या प्रश्नावर त्या म्हणाल्या, उमेदीच्या काळात साहित्यिकांना मान मिळायला हवा. आयुष्याच्या सायंकाळीही चालेल; पण अगदीच तिन्हीसांजेला नको.
पूर्वी संस्कृतला, आज इंग्रजीला महत्त्व : पूर्वी संस्कृतला मोठेपणा मिळत होता. ज्ञानेश्वर, एकनाथांनी प्राकृत भाषेला महत्त्व मिळवून दिले. आता इंग्रजी सर्वश्रेष्ठ भाषा मानली जाते. मात्र, प्राकृतची अस्मिता जपायला हवी. ती जोपर्यंत जपली जाईल, तोपर्यंत लोकसाहित्य अन् भाषाही टिकेल.