सदानंद औंधे ल्ल मिरजकाँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या मिरज तालुक्यातील एरंडोली जिल्हा परिषद मतदारसंघ सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्यामुळे काँग्रेसच्या उमेदवारीसाठी रस्सीखेच आहे. येथे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप अशी तिरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. संगीता आनंदराव सूर्यवंशी (खुळे) व जयश्री तानाजी पाटील यांच्यात उमेदवारीसाठी काँग्रेसअंतर्गत प्रतीक पाटील गट व कदम गटात स्पर्धा आहे. एरंडोली गटात काँग्रेसचे प्रकाश कांबळे यांनी गतवेळची निवडणूक जिंकून बालेकिल्ला कायम ठेवला. या मतदारसंघात काँग्रेसची धुरा माजी सभापती महावीर कागवाडे, खंडेराव जगताप, रामदासआप्पा पाटील, तानाजी पाटील यांच्यावर आहे. आ. मोहनराव कदम, प्रा. सिध्दार्थ जाधव यांनी व प्रतीक पाटील गटाने आपापल्या कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. मात्र उमेदवारीसाठी कोणतेही ठोस आश्वासन न दिल्याने, उमेदवारी कोणाला मिळणार, यावरच निवडणूक अवलंबून आहे. राष्ट्रवादीचे पूर्व भागातील नेते वास्कर शिंदे, बाळासाहेब होनमोरे यांनी उमेदवारांचा शोध सुरू केला आहे. मतदार संघात राष्ट्रवादीची ताकद काँग्रेसच्या तुलनेत तोकडी असली तरी, माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या मदतीने राष्ट्रवादी नेते काँग्रेसला आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. येथे शोभा वास्कर शिंदे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. पंचायत समितीच्या माजी सभापती जयश्री पाटील जिल्हा परिषदेसाठी इच्छुक आहेत. मात्र माजी उपसभापती रामदास पाटील गटाचा त्यांच्या उमेदवारीस विरोध आहे. रामदास पाटील यांनी सलगरे सोसायटीचे अध्यक्ष नाथाजी पाटील यांच्या पत्नी हर्षदा पाटील यांच्यासाठी किंवा एरंडोलीतील संगीता खुळे यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला आहे. जयश्री पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाल्यास रामदास पाटील गट कोणती भूमिका घेणार, यावर निवडणुकीची समीकरणे अवलंबून आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आ. मोहनराव कदम, प्रा. सिध्दार्थ जाधव यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी बैठका व मेळावे घेतले आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँक व पतसंस्थांच्या माध्यमातून राष्ट्रवादी कार्यरत आहे. घोरपडे गटाच्या मदतीने येथे काँग्रेसच्या बालेकिल्ल्यास सुरूंग लावण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. राष्ट्रवादीच्या खंडेराजुरीच्या शोभा वास्कर-शिंदे इच्छुक आहेत. घोरपडे गटातर्फे खंडेराजुरीचे विठ्ठलअण्णा पाटील यांच्या पत्नी सुशिला पाटील इच्छुक आहेत. भाजपतर्फे गतवेळी एरंडोली पंचायत समितीची निवडणूक लढविणारे दिनकर भोसले यांच्या पत्नी सुनीता दिनकर भोसले यांना जिल्हा परिषदेसाठी भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. सलगरे पंचायत समिती गणासाठी काँग्रेसचे तानाजी पाटील यांचे समर्थक वंदना सुरेश कोळेकर व भाजपतर्फे सुजाता विजय पाटील इच्छुक आहेत. अजितराव घोरपडे समर्थक आनंदराव भोई यांच्या पत्नी माजी पंचायत समिती सदस्या शालन भोई निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेसतर्फे महादेव पोपट मलमे, राधिका रोडे याही इच्छुक उमेदवार आहेत. आता कोणाला उमेदवारी मिळणार याकडे एरंडोली मतदार संघातील मतदारांचे लक्ष लागले आहे. यांच्या भूमिकेवरच निवडणुकीचे समीकरण ठरणार... माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांचे समर्थक माजी पंचायत समिती सदस्य आनंदराव भोई, माजी जि. प. सदस्य शिवाजीराव रूपनर, उत्तम माने, रंगराव सपकाळ, बाजार समिती सदस्य दीपक शिंदे, सहदेव कायपुरे, डॉ. मालगावे, राजेंद्र पाटील, शहाजी गायकवाड, अजित कोडग यांच्या भूमिकेवरच निवडणुकीची समीकरणे ठरणार आहेत.
एरंडोलीत काँग्रेस उमेदवारीसाठी रस्सीखेच
By admin | Published: January 11, 2017 11:50 PM