कुंडल : पदवीधरांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करून त्याद्वारे नोकरभरती राबवावी यासाठी शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आमदार अरुण लाड यांनी विधान परिषदेत केली.
आमदार अरुण लाड हे पदवीधर मतदारसंघातून निवडून आल्यानंतर त्यांनी पहिल्या अधिवेशनात भाषण केले. ते म्हणाले की, अनुदानित शाळा संपण्याच्या मार्गावर आहेत. त्या टिकण्यासाठी शिक्षक भरती करून प्रत्येक तुकडीला एक शिक्षक नेमणे आवश्यक आहे. अनेक शासकीय कार्यालयात कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे नागरिकांच्या कामात दिरंगाई होते तसेच वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त पदांमुळे वैद्यकीय व्यवस्था कोलमडलेली आहे. यासाठी ही अत्यावश्यक सेवांची पदे भरणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ते म्हणाले की, शेतकऱ्याच्या पिकाला हमीभाव मिळावा तसेच दूध व्यवसायाला चालना देण्यासाठी शाळांच्या माध्यान भोजनात दुधाचा पुरवठा करण्याची मागणीही त्यांनी केली.