सांगली : विविध क्षेत्रांत जिल्ह्याने वेगळी ओळख निर्माण केली. जिल्हा २०३५ मध्ये अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करेल. तत्पूर्वी जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा तयार करण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांचा ‘व्हिजन सांगली ॲट ७५’ हा फोरम स्थापन केल्याची माहिती समन्वयक माजी महापौर सुरेश पाटील यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत दिली.
ते म्हणाले, कृषी, व्यापार, उद्योग, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, सहकार, राजकारण या क्षेत्रांमध्ये नेमके काय घडते आहे, काय घडवावे लागेल याचा विभागनिहाय आढावा घेऊन आराखडा तयार करावा लागेल. त्यासाठी या फोरमची स्थापना करण्यात आली आहे. सर्व समाजघटकांच्या अपेक्षा विचारात घेऊन जिल्हा नियोजन समितीमार्फत पीडब्ल्यूसी, मेकेन्झी अशा नामवंत कंपन्यांकडून विकास आराखडा तयार करून घेतला जाईल. पालकमंत्री जयंत पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन हाती घेतले आहे. पुढील १५ वर्षांमध्ये आराखड्यानुसार विकासकामे पूर्ण करण्याचे नियोजन केले जाईल. जागतिक बँक, नाबार्ड, केंद्र व राज्य शासन, खासगी संस्था आदी माध्यमातून निधी उभारण्याचाही प्रयत्न आहे.
या फोरममध्ये आटपाडी येथील अखिल भारतीय डाळिंब उत्पादक संघाचे सचिव आनंदराव पाटील, विट्याचे बाबासाहेब मुळीक, भारती विद्यापीठाचे डॉ. हणमंतराव कदम, पलूसचे श्रीपाद चितळे, मिरज मिशन हॉस्पिटलचे डॉ. नथानियल ससे, उद्योजक दीपक शिंदे-म्हैसाळकर, राजाराम सॉल्व्हेक्सचे कार्डिले, दिनकर नायकवडी, सचिन संख, सुभाष आर्वे, टूरिझम ऑपरेटर असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पाटील, दिल्ली येथील ऋषभ सावनसुखा यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.