अविनाश बाड ल्ल आटपाडीज्या टेंभू योजनेच्या पाण्यासाठी आटपाडीकरांना गेली २५ वर्षे अविरतपणे लढा सुरू आहे, त्या योजनेचे पाणी ऐन उन्हाळ्यात आटपाडी तालुक्यात येऊनही त्याचा लोकांना लाभ होऊ शकत नाही. तालुक्यातील ८ तलावात कृष्णामाई येऊ शकत असताना, सध्या फक्त आटपाडी तलावात पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे उर्वरित तलाव कोरडे राहणार आहेत. सर्व तलावांमध्ये पाणी सोडले नाही, तर तालुका भीषण दुष्काळी परिस्थितीला सामोरे जाण्याची भीती निर्माण झाली आहे.सध्या तालुक्यात दुष्काळी परिस्थिती आहे. यावर्षी कुठेही पावसाळ्यातसुध्दा ओढे, नाले वाहिले नाहीत. माणगंगा नदीही कोरडीच राहिली. विहिरींनी केव्हाच तळ गाठला आहे. तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी वाढू लागली आहे. अशा परिस्थितीत सध्या टेंभू योजना सुरू झाली आहे. या योजनेचे पाणी दि. ४ मार्चपासून आटपाडी तलावात सोडण्यात येत आहे. या तलावाची पाणी साठवण क्षमता ३०८.९७ द.ल.घ.फूट एवढी असली तर तलावात सध्या फक्त ७७.0१ द.ल.घ.फूट एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यापैकी ४७ द.ल.घ.फूट एवढे पाणी पिण्यासाठी आरक्षित केले आहे.टेंभू योजनेच्या पाण्याचा दर ४५ हजार रुपये प्रति द.ल.घ.फूट असा आहे. या अवाच्या सवा दरामुळे एवढे महाग पाणी तेही सध्या थेट शेतकऱ्यांच्या शेतात न दिले गेल्याने शेतकऱ्यांनी पैसे भरणे कठीण आहे. सध्या टेंभूचे पाणी फक्त ओढ्याने तालुक्यातील ८ तलावात जाऊ शकते. पण तलावातून थेट पाणी उचलण्यासाठी पाटबंधारे विभाग शेतकऱ्यांना परवाने देत नाही. शिवाय ज्या ओढापात्रातून पाणी जाते, तिथल्या शेतकऱ्यांच्या विहिरीलाही फार काळ पाणी टिकत नाही. त्यामुळे हौसेने आधी ५-१0 हजार प्रत्येक विहिरीसाठी पाणीपट्टी देणारे शेतकरी आता पाणीपट्टीसाठी पैसे देण्यास असमर्थता दाखवित आहेत. त्यात टेंभू योजनेची आवर्तने ठरलेली नाहीत. आता पाणी सोडल्यानंतर पुन्हा कधी पाणी सोडण्यात येणार हे ठरलेले नाही. कोणतेही पीक घेण्यासाठी किमान ३ ते ४ महिने हमखास पाणी मिळावे लागते. टेंभूचे पाणी कधी येणार, हे अद्याप ठरलेले नसल्याने शेतकऱ्यांना या पाण्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होत नाही. यावर पाटबंधारे विभागाने तातडीने मार्ग काढणे गरजेचे आहे.हा सावळा गोंधळ कोण आणि कधी संपविणार ?पाटबंधारे विभागाने यंदा तलावातील पाणी रब्बी हंगामासाठी १६९८ रुपये द.ल.घ.फूट या दराने शेतीसाठी दिले. हे पावसाचे पाणी होते. आटपाडी तालुक्यात पाऊस कमी पडतो म्हणून शासनाचा टेंभू योजनेच्या पाण्याचा दर ४५ हजार रुपये द.ल.घ.फूट आहे. शिवाय जगात सर्वत्र शेतकऱ्याचा हंगाम यशस्वी झाल्यानंतर पाणीपट्टी घेण्याची पध्दत आहे. दुष्काळी भागासाठी केलेल्या टेंभू योजनेची पाणीपट्टी आधी भरावी लागत आहे. त्यामुळे यंदा केवळ आटपाडी तलावातून पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांनी २0 लाख रुपये आधी भरले. इतरत्र कुणीच पैसे दिले नाहीत. म्हणून शेतकऱ्यांच्या नावाने शिमगा करणे योग्य आहे काय? हा सावळागोंधळ कोण आणि कधी संपविणार? हा प्रश्न आहे.
‘टेंभू’ येऊनही आटपाडीचे तलाव कोरडेच
By admin | Published: March 15, 2017 11:48 PM