सांगलीत ‘महाआघाडी’च्या नेत्यांमध्ये विधानसभेपूर्वीच कुरघोड्या

By अशोक डोंबाळे | Published: July 1, 2024 06:10 PM2024-07-01T18:10:52+5:302024-07-01T18:12:39+5:30

जतमध्ये ‘विश्वजीत’ना जयंतरावांचा शह 

Even before the allocation of seats in the Assembly, the politics of crooked horses among the leaders of Sangli Mahavikas Aghadi | सांगलीत ‘महाआघाडी’च्या नेत्यांमध्ये विधानसभेपूर्वीच कुरघोड्या

सांगलीत ‘महाआघाडी’च्या नेत्यांमध्ये विधानसभेपूर्वीच कुरघोड्या

अशोक डोंबाळे

सांगली : जिल्ह्यातील जत, मिरज व खानापूर - आटपाडी या तीन विधानसभा मतदारसंघांत तयाच्या सूचना काँग्रेस, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि उध्दवसेना या पक्षांच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. यावरून विधानसभा जागा वाटपापूर्वीच महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये कुरघोड्यांचे राजकारण चांगलेच तापले आहे.

नूतन खासदार विशाल पाटील यांचा आठवड्यापूर्वी सांगलीत मेळावा झाला. यावेळी काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष व पलूस - कडेगावचे आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला जनतेने भरभरून मदत केली आहे. कार्यकर्त्यांनी आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे. काँग्रेस पक्षाकडे जिल्ह्यातील पलूस - कडेगाव, सांगली, जत, मिरज, खानापूर - आटपाडी अशा पाच जागा मागणार आहे. या ठिकाणी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, अशी सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या होत्या. या मेळाव्यानंतर उध्दवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी खानापूर - आटपाडी आणि जत विधानसभा मतदारसंघावर उध्दवसेनेचाच दावा आहे. या जागेवर अन्य कुणीही दावा सांगू नये, अशी मागणी केली होती.

चार दिवसांपूर्वी सांगलीत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली. या बैठकीस प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार सुमनताई पाटील, आमदार अरूण लाड यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. 

यावेळी जयंत पाटील म्हणाले, ‘वाळवा, शिराळा आणि तासगाव - कवठेमहांकाळ येथे आमच्याच पक्षाचे आमदार आहेत. आता जिल्ह्यातील आणखी तीन जागा पक्षाला मिळवाव्या लागतील. यासाठी मिरज, जत व खानापूर - आटपाडीतील कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे.’

खानापूर-आटपाडीसाठी दोन्ही काँग्रेसचा दावा

खानापूर - आटपाडीचे प्रतिनिधीत्व करणारे अनिल बाबर यांचे आकस्मिक निधन झाले. ही जागा सध्या रिक्त असली तरी या ठिकाणी शिवसेनेचे प्रतिनिधी म्हणून आमदार बाबर यांची निवड झाली होती. त्यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला होता. तरीही या जागेवर उध्दवसेनेने दावा केला आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनीही दावा केल्याने महाविकास आघाडीत जागा वाटपापूर्वीच नेत्यांमध्ये कुरघोड्यांचे राजकारण रंगले आहे.

जतमध्ये ‘विश्वजीत’ना जयंतरावांचा शह 

डॉ. विश्वजीत कदम यांनी जिल्ह्यात पाच आमदार काँग्रेसचे निवडून आणायचे आहेत, असे जाहीर वक्तव्य केले. सध्या पलूस - कडेगाव आणि जत या मतदारसंघांचे प्रतिनिधित्व काँग्रेसकडे आहे. जतमध्ये डॉ. कदम यांचे नातेवाइक आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह सावंत हे आमदार आहेत. त्यांनाच काँग्रेसकडून संधी दिली जाण्याची शक्यता असताना राष्ट्रवादीनेही येथे तयारी सुरू केल्याने हा एक प्रकारे कदम यांना शह देण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Web Title: Even before the allocation of seats in the Assembly, the politics of crooked horses among the leaders of Sangli Mahavikas Aghadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.